गुडघाभर खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास; मोठ्या अपघाताची प्रतीक्षा?
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील पश्चिम भागातील व्याहाळी ते धोम या धरणाखालच्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूच्या सापळ्यात रूपांतरित झाला आहे. धरणाच्या खाली कोट्यावधी रुपये खर्चून पूल बांधण्यात आला असून हा पूल हजारो नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणाचा कणा ठरला आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या कडेच्या मुख्य रस्त्याला याच विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे मंजुरी मिळालेली नाही. रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असतानाही कालव्यालगतच्या सुमारे एक किलोमीटर रस्त्याला पाटबंधारे विभागाने परवानगी नाकारल्याने हा महत्त्वाचा दुवा आजही रखडलेला आहे. यामुळे पश्चिम भागातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या अपूर्ण रस्त्यावर सध्या गुडघाभर खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या मार्गावरून चालणेही कठीण झाले असून दुचाकीस्वार रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या रस्त्यावर मुरूम टाकणे, खडीकरण करणे किंवा कोणतीही देखभाल करण्याचे सौजन्यही संबंधित विभागाने दाखवले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हा रस्ता पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारा जीवनदायी दुवा असून शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार आणि सामाजिक नातेसंबंध टिकवून ठेवण्यात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र केवळ प्रशासकीय अडेलतट्टूपणामुळे हजारो नागरिकांना रोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे या परिसरात पर्यटनासाठी राज्यासह विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहून अनेक पर्यटक या मार्गाने जाणे टाळत आहेत. परिणामी स्थानिक पर्यटन, रोजगार आणि व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. लहान वाहनांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरला असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी केवळ कागदोपत्री अडथळे निर्माण करण्याऐवजी प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याला तातडीने परवानगी द्यावी, कालव्यालगतच्या उर्वरित रस्त्याच्या कामास मंजुरी देऊन संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी पश्चिम भागातील नागरिकांकडून होत आहे. आता तरी पाटबंधारे विभाग जागा होणार का, की एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला खडबडून जाग येणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
धोम मंदिरांकडे जाणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास
"हा रस्ता धरण निर्माण झाले त्या १९७२ सालापासून कार्यरत आहे. हा रस्ता धरणाच्या दोन्ही टोकांना आणि पर्यायाने दोन्ही भागांतील नातेसंबंधांना जोडण्याचा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात दळणवळण होत असते तसेच पर्यटनालाही चालना मिळते. पुरातन काळातील धोम येथील मंदिरे पाहण्याकरता पर्यटक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात आणि ते याच रस्त्याचा अवलंब करतात. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन या रस्त्याला तूर्ताच परवानगी द्यावी."
– सचिन मानकुंबरे (ग्रामस्थ, व्याहाळी)
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



