हॉटेल मालकानेच केला महिला कर्मचारीचा खून; ५ तासांत आरोपी गजाआड
शिवशाही वृत्तसेवा,अक्कलकोट प्रतिनिधी
वागदरी (ता. अक्कलकोट) येथील हॉटेल सिद्धगंगाच्या मालकानेच आपल्या हॉटेलमधील महिला कर्मचारीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
वागदरी शिवारातील एका पडक्या विहिरीजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. अवघ्या काही वेळातच मृत महिलेची ओळख लक्ष्मीबाई भालचंद्र जाधव (रा. वागदरी) अशी पटली.
अनैतिक संबंधातून हत्या
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हॉटेल सिद्धगंगाचे मालक परमेश्वर सिध्दाराम पोमाजी (रा. वागदरी) यांचे मृत लक्ष्मीबाई यांच्याशी अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते आणि वाद होत होते. सततच्या वादाला कंटाळून आरोपी परमेश्वर पोमाजी याने रागाच्या भरात लक्ष्मीबाई यांचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह जवळच असलेल्या पडक्या विहिरीमध्ये फेकून दिला.
पोलिसांची तत्परता
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या ५ तासांत या खुनाचा उलगडा केला आणि आरोपी परमेश्वर पोमाजी याला अटक केली.
या गुन्ह्याबाबत आरोपीवर बी.एन.एस. कलम १०३(१), २३८, ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार व त्यांच्या टीमने केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



