भुईज पोलीस ठाण्यात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योगासन उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
"योगामुळे केवळ शारीरिक आरोग्यच चांगले राहते असे नाही, तर मानसिक शांतताही लाभते. आजच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकाने योगासने रोज करून आपल्या जीवनात योग हा अविभाज्य घटक बनवला पाहिजे," असे आवाहन भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार, दिनांक २१ जून रोजी भुईज येथील पोलीस ठाण्याच्या आवारात सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
२१ जूनचे महत्त्व आणि पार्श्वभूमी
आपल्या मार्गदर्शनात ताटे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सुरुवातीचा आणि या विशिष्ट दिवसाचा संदर्भ दिला. संपूर्ण मानवजातीला योगाचा फायदा व्हावा यासाठी देशाचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या काही महिन्यांतच याला जागतिक मान्यता मिळाली. २१ जून हा दिवस निवडण्यामागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण सांगताना ते म्हणाले की, हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवसानंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. हा काळ योग आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत पूरक आणि खास मानला जातो, म्हणूनच २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा केला जातो.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
भुईज पोलीस ठाण्याच्या प्रांगणात झालेल्या या सामूहिक योग उपक्रमात सर्वांनी अत्यंत आवडीने आणि उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी विविध प्रकारची आसने आणि प्राणायाम करण्यात आले.
या कार्यक्रमाला भुईज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी वैभव टकले, दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत भोसले, राजाराम माने, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, नितीन जाधव, सुशांत धुमाळ (पो.ना.), तसेच पोलीस कॉन्स्टेबल आगम, नवघणे, कदम, सपकाळ, चव्हाण उपस्थित होते. याशिवाय महिला पोलीस अंमलदार ननावरे, चव्हाण, बांगर, जाधव आणि होमगार्ड दलाच्या जवानांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवून योगासने केली.
नखापासून केसापर्यंत संपूर्ण शरीरावर उपचार म्हणजे 'योग' !"योग साधना ही अत्यंत सोपी असून ती कोणालाही करता येते. आपले मन, शरीर आणि शरीरातील सर्व ऊर्जा चक्रांना पुनरुज्जीवित करून नवचैतन्य देण्याचे काम योगासने करतात. योगातील सर्व आसनांची रचना मानवी शरीराची नैसर्गिक रचना लक्षात घेऊनच करण्यात आली आहे. नखापासून ते केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला योग्य दिशा देण्याची आणि त्यावर नैसर्गिक उपचार करण्याची ताकद योगासनात आहे."पृथ्वीराज ताटे(सहाय्यक पोलीस निरीक्षक, भुईज)
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



