पंढरपुरात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे दिमाखदार वितरण
शिवशाही वृत्तसेवा, जत
परिमल सांस्कृतिक व्यासपीठ, रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर) यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे अत्यंत थाटात आणि दिमाखदार सोहळ्यात श्रीक्षेत्र पंढरी नगरीमध्ये वितरण करण्यात आले. या सोहळ्यात राज्यभरातील विविध श्रेणींतील ३१ साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जत येथील रावसाहेब साठे यांच्या चुकारीची फुलं या कविता संग्रहाला काव्य परिमल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मराठी साहित्य परिषदेचे पंढरपूर शाखा अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रणव परिचारक, आदर्श माता पुष्पलता निकम आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिमलचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा संस्थेचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तर आजच्या काळात साहित्यासाठी समर्पित भावनेने काम करणं ही मोठी गोष्ट आहे अशा शब्दात मंचावरील मान्यवरांनी परिमल सांस्कृतिक व्यासपीठ च्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचा समारोप करताना कवी रवी वसंत सोनार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले साहित्यिक आणि रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



