अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ आक्रमक - तहसीलदारांकडे निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर ( मनिषा कुलकर्णी)
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पंढरपूर शहर आणि तालुक्यातील पत्रकार बांधव अत्यंत आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ 'अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघा'च्या वतीने पंढरपुरात तीव्र आंदोलन छेडत खासदार पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी
आज पंढरपूर तहसील कार्यालयाच्या परिसरात तालुक्यातील व शहरातील शेकडो पत्रकार सदस्य एकत्र आले होते. या वेळी उपस्थित पत्रकारांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात आणि पत्रकारांवरील अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. आंदोलन संपल्यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
हे आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने आणि प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. आंदोलनाचे नेतृत्व सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, नागेश सुतार आणि तानाजी जाधव यांनी केले. या आंदोलनात पंढरपूर परिसरातील डिजिटल, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे शेकडो पत्रकार बांधव स्वतःहून रस्त्यावर उतरले होते.
दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी!"लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अशा प्रकारे जाहीरपणे धमकावणे आणि शिवीगाळ करणे अत्यंत क्लेशदायक असून हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. खासदार संजय दिना पाटील यांच्यावर शासनाने तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, हीच आमची मुख्य मागणी आहे."- सचिन कुलकर्णीसोलापूर जिल्हाध्यक्ष,डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ
शासन काय पावले उचलणार? याकडे लक्ष
राज्यात वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या आणि अन्याय यांमुळे पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट आहे. लोकप्रतिनिधींकडूनच जर अशी वर्तणूक मिळत असेल, तर पत्रकारांनी सुरक्षितपणे काम कसे करावे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन शासन संबंधित खासदारांवर काय पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे आणि माध्यम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



