लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला - खा. संजय दिना पाटील यांच्याविरोधात वाईत पत्रकारांचा एल्गार

वाई तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेचे प्रशासनाला  निवेदन

Journalists' Protest, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

'लोकशाहीचा चौथा स्तंभ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लोकप्रतिनिधींकडूनच हल्ले होत असल्याचा निषेध करत, वाई तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेने आज आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेचे खा. संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी वाईतील पत्रकारांनी पुणे विभागीय अधिस्वीकृती सदस्य, महाराष्ट्र राज्य तथा सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे आणि डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला निवेदन सादर करून एल्गार पुकारला आहे.

     खा. संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे वाईसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. "एक जबाबदार लोकप्रतिनिधी जेव्हा अशा पातळीवर घसरून पत्रकारांना धमकावतो, तेव्हा ती केवळ एका व्यक्तीला दिलेली धमकी नसून लोकशाही व्यवस्थेचाच गळा घोटण्याचा प्रयत्न आहे," अशी संतप्त भावना पत्रकार संघटनांनी व्यक्त केली आहे.

     प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे खा. संजय दिना पाटील यांच्यावर 'पत्रकार संरक्षण कायद्या' अंतर्गत आणि संबंधित कलमांनुसार तात्काळ अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, संबंधित खासदाराला तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांनी राजीनामा द्यावा, तसेच वाईसह राज्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने निश्चित करावी, अशा मागण्या पत्रकार संघाने केल्या आहेत.

     आज वाई तालुक्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरून शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदवत आहेत. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोषींवर पुढील २४ तासांच्या आत ठोस कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि 'आक्रमक' केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

     यावेळी बोलताना दत्ता मर्ढेकर (जिल्हा उपाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ) म्हणाले की, "गद्दार शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी आमच्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. अर्वाच्य भाषा आणि घाणेरडे शब्द वापरलेले आहेत, त्याचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर सर्वच पत्रकारांच्या वतीने मोर्चे काढून निषेध करत आहोत. वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही संजय दिना पाटीलांचा तीव्र निषेध करतो. सरकारने त्यांना कोणतीही माफी न देता थेट अटक करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. पूर्वीचं राजकारण फार चांगलं होतं, राजकारणातली लोकंही चांगल्या वृत्तीची होती. अलीकडे अतिशय घाणेरड्या वृत्तीचं राजकारण सुरू झालेलं असून त्याची पातळी फार खालच्या लेव्हलला गेलेली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसं सुद्धा या राजकारणाला कंटाळली असून 'लोकशाही जिवंत आहे का?' असा प्रश्न सामान्यांना पडत आहे."

तर सचिन ननावरे (मराठी पत्रकार संघ, वाई तालुका अध्यक्ष) म्हणाले की, "खा. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतात. अशा धमक्या देणाऱ्या लोकप्रतिनिधीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. सरकारने केवळ माफी मागितली म्हणून त्यांना सोडू नये. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत पत्रकार संघ शांत बसणार नाही. आम्ही जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून हे निवेदन दिले असून, पुढील पावले त्यांच्याशी चर्चा करून उचलली जातील. हे आंदोलन यापुढे अधिक तीव्र केले जाईल."

     दरम्यान, "लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही कोणत्याही थराला जाण्यास मागे-पुढे पाहणार नाही," असा ठाम पवित्रा वाई तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेने यावेळी घेतला आहे. प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटतील, अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !