चोरीस गेलेले अडीच लाखांचे मंगळसूत्र अवघ्या दोन दिवसांत हस्तगत
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई एसटी स्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेले सुमारे २ तोळे वजनाचे व अंदाजे ₹२.५० लाख किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अवघ्या दोन दिवसांत शोधून काढत वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक महिला आरोपीस अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जून २०२६ रोजी दुपारी श्रीवर्धन–सातारा बसमध्ये चढत असताना दिशा निखील कळंबे यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल विक्रम धोत्रे यांनी एसटी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये एक महिला संशयास्पद हालचाली करताना आढळून आली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिचा शोध सुरू केला.
दरम्यान, गोपनीय माहितीदारामार्फत संबंधित महिला पुन्हा एसटी स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाला असून तिने चोरीची कबुली दिली. न्यायालयाच्या पूर्व परवानगीनंतर तिला अटक करण्यात आली.
आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २ तोळे वजनाचे व अंदाजे ₹२.५० लाख किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम धोत्रे, नितीन कदम, हेमंत शिंदे, श्रावण राठोड तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा गोळे व स्नेहल सोनवणे यांच्या पथकाने पार पाडली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष अभिनंदन केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



