पावसाची पहिलीच दमदार बॅटिंग - वाई पालिकेचे कागदी घोडे पाण्यात

मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप - पहिल्याच पावसाने जनजीवन विस्कळीत

Heavy rainfall, cibilin life disturb, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

उन्हाच्या तीव्र चटक्याने आणि उष्णतेने हैराण झालेल्या वाईकर नागरिकांना आणि दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आजच्या पावसाने दिलासा तर दिला; मात्र याच पावसाने वाई नगरपालिकेच्या विकासाच्या दाव्यांची आणि भोंगळ कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. पहिल्याच दमदार पावसात वाईतील 'ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक' (गुलाबराव खामकर पथ) या मुख्य रस्त्याने चक्क नदीचे रूप धारण केले होते. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे पादचारी आणि वाहनचालकांचे अतोनात हाल झाले.

निवडणुकीच्या काळात विकासाचा डांगोरा पिटून मतं मागणारे लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन या रस्त्याकडे कायम दुर्लक्ष करत असल्याचे आज पुन्हा एकदा उघड झाले आहे.

नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बंदिस्त गटारे आणि रस्ते तर चकाचक केले, पण रस्त्यावरील पावसाचे पाणी नेमके जाणार कुठे? याचे कोणतेही नियोजन पालिकेला करता आलेले नाही. "फक्त बंदिस्त गटारे आणि रस्ते बांधणे म्हणजेच विकास नव्हे, हे पालिका प्रशासन आणि अंध बनलेल्या लोकप्रतिनिधींना कोण समजावून सांगणार?" अशी संतप्त चर्चा आज वाईतील चौकाचौकात रंगली होती. आज तर सुरुवात आहे, जर यापेक्षा जास्त पाऊस झाला, तर थेट नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

ज्या वाईकरांच्या जीवावर निवडून आलात, त्यांना जर साध्या मूलभूत सुविधाही देता येत नसतील, तर लोकप्रतिनिधींनी तात्काळ राजीनामे देऊन आपल्या खुर्च्या रिकाम्या कराव्यात, अशी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया संतप्त वाईकरांमधून उमटत आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे.

२५ जून रोजी झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातच जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी जर स्वतः नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना दाद देत नसतील, तर सामान्य जनतेने दाद मागायची कोणाकडे? पालिकेच्या एसी केबिनमध्ये बसून विकासाचे कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी जमिनीवर उतरावे. वाईकरांचे होणारे हाल स्वतःच्या डोळ्यांनी पहावेत आणि यावर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा वाईकर जनता पालिकेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही!

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !