वाई तालुक्यातील कृषी प्रकल्पांची पाहणी; आधुनिक शेती व प्रक्रिया उद्योगांवर भर
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे आणि शेतीचे उत्पादन टिकवून ठेवणे हे शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी 'CRA' (Climate Resilient Agriculture - बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी शाश्वत शेती) तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले.
वाई तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांना आणि योजनांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी फरांदे यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी कुसगाव (ता. वाई) येथील प्रगतशील शेतकरी संजीव वरे यांच्या आंबा लागवडीला भेट दिली. तेथे 'CRA' तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेल्या कामांची त्यांनी कौतुक करत पाहणी केली. त्यानंतर पसरणी येथील सुनील महांगडे यांच्या 'भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने'अंतर्गत विकसित फळबागेची पाहणी करण्यात आली. तसेच याच ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या मसाला प्रक्रिया उद्योगालाही त्यांनी भेट दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना भाग्यश्री फरांदे म्हणाल्या की, "शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल."
वाई तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी अत्यंत समाधानकारक असून, तालुक्यातील कामकाज उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. या दौऱ्यामुळे तालुक्यातील आधुनिक व शाश्वत शेतीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी वाईचे तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार, उप कृषी अधिकारी किरण बाबर, निखिल मोरे, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जगताप व प्रवीण नाळे उपस्थित होते. तसेच प्रगतशील शेतकरी सुनील महांगडे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव वरे, राजश्री वरे, शिवराज वरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



