वाहतुकीचे निर्णय कागदावरच - प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकेरी वाहतुकीचे निर्णय कागदावरच राहिले असून प्रत्यक्षात मात्र शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र दिसत आहे.
वाई शहरात सध्या पार्किंगचा प्रश्न सर्वात गंभीर बनला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा बेछूट पार्किंग, मालवाहू वाहनांची कुठेही उभी केलेली रांग आणि नियमांचे उघड उल्लंघन यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. किसनवीर चौक ते चित्रा टॉकीज हा रस्ता एकेरी घोषित असतानाही दोन्ही बाजूंनी पार्किंग केल्यामुळे चारचाकी तर दूरच, दुचाकी चालवणेही अवघड झाले आहे.
मांढरदेवकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरही अतिक्रमण आणि अनियमित पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. एकेरी वाहतुकीला सर्रास धाब्यावर बसवून विरुद्ध दिशेने वाहनांची ये-जा सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महागणपती मंदिर परिसरात, विशेषतः बारक्या पुलावर होणारे पार्किंग वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे.
या सर्व परिस्थितीला स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात पोलीसांचा धाक उरलेला नसल्याने कोणीही कुठेही वाहन उभे करून निघून जात आहे. नियमभंग करणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
नगरपरिषदेतील अनेक नगरसेवकही या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. काही मोजकेच लोकप्रतिनिधी पार्किंगच्या मुद्द्यावर आवाज उठवत असताना इतर मात्र मौन बाळगून आहेत. ही बाब नागरिकांच्या रोषाला अधिकच खतपाणी घालत आहे.
तज्ज्ञांच्या मते, शहरातील मोकळ्या जागांचा उपयोग करून नियोजित पार्किंग व्यवस्था उभारणे अत्यंत गरजेचे आहे. नगरपालिकेच्या इमारतीमागील जागा किंवा मंडई परिसरात ‘पे अँड पार्क’ योजना राबविल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो आणि पालिकेलाही महसूल मिळू शकतो.
वाई शहराला वाहतूक कोंडीमधून मुक्त करायचे असेल तर कडक अंमलबजावणी, वाढीव पोलीस बंदोबस्त, नियोजनबद्ध पार्किंग आणि राजकीय इच्छाशक्ती या सर्व गोष्टींची तातडीने गरज आहे. अन्यथा भविष्यात शहरात चारचाकी वाहन घेऊन फिरणेही अशक्य होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी वाईकरांकडून होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




