चांदवडी पुनर्वसन ग्रामपंचायतीचा नवा आदर्श - हिरकणी कक्षातून सुरक्षित मातृत्वाला बळ

बालस्नेही व महिलास्नेही गावाकडे यशस्वी वाटचाल; जिल्हास्तरीय समितीकडून उपक्रमाचे विशेष कौतुक

The Gram Panchayat set up a Hirkani room, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई  (प्रतिनिधी शुभम कोदे )

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण विकासाला नवी दिशा देताना, वाई तालुक्यातील चांदवडी पुनर्वसन ग्रामपंचायतीने एक अत्यंत नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. गावातील माता आणि बालकांच्या आरोग्याचा व सन्मानाचा विचार करून ग्रामपंचायतीने उभारलेला हिरकणी कक्ष' सध्या जिल्हाभरात कौतुकाचा विषय ठरत असून, बालस्नेही व महिलास्नेही गाव घडवण्याच्या प्रवासातील हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

'छोट्या जागेत मोठा विचार'

अल्प उत्पन्न आणि मर्यादित साधनसामग्री असतानाही, चांदवडी पुनर्वसन ग्रामपंचायतीने उपलब्ध जागेचा कल्पक वापर करून हा कक्ष साकारला आहे. विविध कामांनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या मातांना आपल्या बालकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरणात स्तनपान करता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. "छोट्या जागेत मोठा विचार" अशी प्रचिती देणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

नुकतीच जिल्हास्तरीय समितीने या ग्रामपंचायतीला भेट देऊन पाहणी केली असता, समितीने या कल्पकतेची दखल घेत हा उपक्रम राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरू शकतो, असे गौरवोद्गार काढले. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे गुणांकन उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विकासाच्या नव्या दृष्टीकोनाची साक्ष मिळत आहे. याकामी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप व सर्व अधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

लोकप्रतिनिधींचा पुढाकार व महिलांचे समाधान

हा कक्ष साकारण्यात सरपंच फरीदा शेख, उपसरपंच रामदास शिंदे, ग्रामविकास अधिकारी संतोष अनगळ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. स्तनपानासाठी स्वतंत्र व सुरक्षित जागा उपलब्ध झाल्याने महिलांमध्ये समाधान आणि आत्मविश्वास वाढला आहे. गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग आणि शाळा मुख्याध्यापिका यांनीही या सुविधेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

एकूणच, हिरकणी कक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत महिला व बालकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले आहे. या मोहिमेत गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, युवक आणि पदाधिकारी यांनी मोठे सहकार्य केले असून, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !