वाईत थरार - कौटुंबिक कलहातून मावशी अन् काकांवर चाकूने प्राणघातक हल्ला

पैशांच्या वादातून महाभारत, आरोपी पुतण्याला काही तासांतच बेड्या
Crime news, Stabbing attack due to domestic dispute, police, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पैशांच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून सख्ख्या पुतण्याने आपल्या मावशी आणि काकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाई येथील रविवार पेठ भागात घडली आहे. या भीषण हल्ल्यात काका गंभीर जखमी झाले असून, वाई पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत अवघ्या काही तासांतच आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत भगवान राजपुरे (वय २५, रा. कणूर, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठ येथील भिमकुंड आळीतील गजेंद्र अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तक्रारदार अनिता श्रीनिवास शेलार (वय ४२) यांच्या घरी त्यांची बहीण आली होती. दरम्यान, बहिणीचा मुलगा (आरोपी प्रशांत राजपुरे) याने त्याच्या आईला फोन करून गाडी खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने प्रशांतने फोनवरच, "तू जिथे कामाला जातेस, तिथे गेटवर येऊन तुला चाकूने मारून टाकीन," अशी उघड धमकी आपल्या सख्ख्या आईला दिली.

मध्यस्थी करणे आले अंगलट
बहिणीला मिळणारी धमकी पाहून मावशी अनिता शेलार यांनी मध्यस्थी केली. त्यांनी फोनवर प्रशांतला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे प्रशांतचा राग अधिकच अनावर झाला. फोन ठेवल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तो थेट वाई येथील मावशीच्या घरी पोहोचला. "आमच्या आई-मुलाच्या वादात बोलणारी तू कोण?" असे म्हणत त्याने मावशी अनिता यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

काकांवर चाकूने सपासप वार
आपल्या पत्नीला मारहाण होत असल्याचे पाहून पती श्रीनिवास वामन शेलार हे वाद सोडवण्यासाठी मध्ये पडले. याचा राग येऊन आरोपी प्रशांतने, "तुमचा काही संबंध नसताना मध्ये का बोलता? आता तुम्हाला जिवंत सोडत नाही," असे ओरडत स्वतःसोबत आणलेला धारदार चाकू काढला. त्याने श्रीनिवास यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात श्रीनिवास गंभीर जखमी झाले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने मध्यस्थी करणाऱ्या मावशी आणि स्वतःच्या आईवरही चाकूने वार करून त्यांना जखमी केले.

वाई पोलिसांकडून आरोपीला मध्यरात्रीच बेड्या
या रक्ताळलेल्या थरारानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली आणि फरार होण्याच्या बेतात असलेल्या आरोपी प्रशांत राजपुरे याला १९ मे रोजी पहाटे १:४७ वाजताच्या सुमारास अटक केली.

याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाळुंज करत आहेत. सध्या घटनास्थळी आणि रविवार पेठ परिसरात शांतता आहे. 

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !