वाईच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अनागोंदी - नागरिकांत संताप

दिशादर्शक फलक नाहीत, लिफ्ट बंदच, ज्येष्ठ नागरिकांची पायपीट वाढली

Inconvenience in Government Offices, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई शहरातील विविध शासकीय कार्यालये गेल्या काही वर्षांत वाई येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. मात्र, कोणते कार्यालय कोणत्या मजल्यावर आहे, याची कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ अथवा प्रत्येक मजल्यावर कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. परिणामी, कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना कार्यालये शोधण्यासाठी वारंवार जिने चढ-उतार करावे लागत असून प्रशासनाच्या या हलगर्जी कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वाई तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक ज्येष्ठ नागरिक विविध शासकीय कामांसाठी येथे येतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि कार्यालयांची माहिती नसल्याने त्यांना अक्षरशः हेलपाटे मारावे लागत आहेत. “प्रशासकीय इमारत झाली, पण नागरिकांच्या सोयींचा विचार कुठे आहे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, इमारत तयार होऊन जवळपास तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटून गेला असतानाही इमारतीतील लिफ्ट अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना पायऱ्या चढून वरखाली करावे लागत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी कुलर बसविण्यात आले असले तरी तेही बंद अवस्थेत असल्याने उन्हाळ्यात नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीत मूलभूत सुविधा मात्र ठप्प असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

वाईचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन इमारतीच्या प्रवेशद्वारावर व प्रत्येक मजल्यावर कार्यालयनिहाय दिशादर्शक फलक लावावेत, बंद आसलेली लिफ्ट त्वरित सुरू करावी तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी वाईकर नागरिकांकडून होत आहे. 

“सामान्य नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या इमारतीत नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत असेल, तर ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे,” अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !