संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्हा रुग्णालय सातारा येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक अधीक्षकाला वैद्यकीय बिलांची वर्गवारी करून ती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीनिवास गजानन जोशी (वय ५२), सहाय्यक अधीक्षक, वर्ग-३, ग्रामीण रुग्णालय काशिळ, प्रतिनियुक्तीवर जिल्हा रुग्णालय सातारा येथे कार्यरत आहेत. तक्रारदार हे शासकीय कर्मचारी असून त्यांच्या वडिलांवर साताऱ्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले होते. उपचारासाठी वेदांत हेल्थ केअर सेंटर, साईअमृत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि जरग हॉस्पिटल येथे मिळून लाखो रुपयांची वैद्यकीय बिले झाली होती.
या वैद्यकीय बिलांची आजार वर्गवारी करून ती वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या कामासाठी आरोपी श्रीनिवास जोशी यांनी तक्रारदाराकडे ३३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. पडताळणीदरम्यान पंचासमक्ष आरोपीने ३० हजार रुपयांवर तडजोड केली.
त्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. जिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील वैद्यकीय बिल कक्ष क्रमांक २२-ब मध्ये आरोपी श्रीनिवास जोशी यांनी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार धनंजय खाडे, अजित पाटील आणि सुदर्शन पाटील यांच्या पथकाने केली. तपास पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



