जागतिक संघर्षांच्या आड दडलेले समीकरण समजून घेणे गरजेचे - अभिजीत जोग
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई वसंत व्याख्यानमालेत “सध्याची युद्ध परिस्थिती आणि भारत” या विषयावर अभिजीत जोग यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. उमेश सणस होते.
अभिजीत जोग यांनी आपल्या व्याख्यानात भूराजकीय घडामोडी आणि युद्धांचे स्वरूप स्पष्ट करत सांगितले की, “भूराजकीय घटनांमध्ये युद्ध ही सर्वात मोठी घटना असते. ती समजून घेण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात,दिसते ते पूर्ण सत्य नसते आणि दोन अधिक दोन नेहमी चारच होतील असे नसते. हिमनगाप्रमाणे वर दिसणारा भाग केवळ ३० टक्के असतो; उरलेला भाग पाण्याखाली दडलेला असतो. त्यामुळे प्रत्येक युद्धामागील लपलेले पदर समजून घेणे आवश्यक आहे. इतिहासात एका युद्धामुळे अनेक घटनांची साखळी निर्माण होते. ईस्टर्न रोमन साम्राज्यावर इस्लामिक आक्रमण झाल्यानंतर भारत-युरोप व्यापार मार्ग बंद झाला आणि त्यातूनच कोलंबस व वास्को-द-गामा यांच्या समुद्री मोहिमा घडल्या. यामुळे अमेरिका या नव्या खंडाचा शोध लागला आणि जागतिक इतिहासाची दिशा बदलली. अशा प्रकारे छोट्या युद्धांचेही परिणाम दूरगामी असतात.
विसाव्या शतकातील दोन महत्त्वाच्या घटनांनी आजच्या जगाची रचना ठरवली. पहिले आणि दुसरे महायुद्ध. पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंड आणि फ्रान्सने अनेक देशांची सीमारेषा मनमानी पद्धतीने आखली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आणि १९८९ मध्ये रशियाचे विघटन झाले. त्यानंतर जगाच्या भविष्यासंदर्भात दोन भाकिते मांडली गेली, फ्रान्सिस फुकूयामा यांनी पाश्चिमात्य उदारमतवादी लोकशाहीचा विजय होईल असे म्हटले, तर सॅम्युअल हंटिंग्टन यांनी ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’ची संकल्पना मांडली. आजच्या घडामोडी पाहता हंटिंग्टन यांचे भाकीत अधिक वास्तव वाटते.
सध्याच्या संघर्षांचे अनेक पदर आहेत. जुडीयो-ख्रिश्चन आणि इस्लामिक सभ्यतांमधील संघर्ष हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. इस्रायल हा ज्यू देश असून त्याच्या सभोवताली इस्लामिक राष्ट्रे आहेत. इराणकडे अण्वस्त्र क्षमता वाढल्यास जागतिक पातळीवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रदेशातील तणाव वाढत आहे.
दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे चीनचा उदय. चीनने राजकीय कम्युनिझम राखत भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली आणि प्रचंड आर्थिक व लष्करी शक्ती निर्माण केली. पाश्चिमात्य देशांच्या अपेक्षेप्रमाणे चीनने त्यांची संस्कृती स्वीकारली नाही; उलट स्वतःच्या ‘मिडल किंगडम’ संकल्पनेला बळ देत महासत्ता बनण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. ऊर्जा स्रोतांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्नही याच संदर्भात पाहावे लागतात. इस्लामिक जगतातील अंतर्गत स्पर्धाही महत्त्वाची आहे. सुन्नी आणि शिया या दोन पंथांमधील नेतृत्वासाठीची चढाओढ, १९७९ नंतर वाढलेला दहशतवाद आणि त्यामागील राजकीय समीकरणे यामुळे जागतिक तणाव अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. सांस्कृतिक मार्क्सवाद ही आणखी एक प्रभावी विचारधारा असून तिचा उद्देश पारंपरिक कुटुंबव्यवस्था, धर्म आणि संस्कृती यांना कमकुवत करणे हा आहे. आर्थिक संघर्षाऐवजी सांस्कृतिक पातळीवर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये विद्यापीठे, चित्रपटसृष्टी आणि विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये विचारप्रवाह निर्माण केले जातात.
रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात सांस्कृतिक आणि भौगोलिक घटक महत्त्वाचे आहेत. युक्रेनचा पूर्व भाग रशियन संस्कृतीशी जवळीक राखतो, तर पश्चिम भाग वेगळ्या परंपरेशी जोडलेला आहे. नाटो संघटनेचा विस्तार रशियाच्या सीमेकडे होत गेल्यामुळे हा संघर्ष उभा राहिला.
अमेरिकन ‘डीप स्टेट’ ही संकल्पना जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “जगभरातील प्रभावशाली संस्थांद्वारे आणि शिक्षण व्यवस्थेद्वारे विचारप्रवाह निर्माण करून विविध देशांमध्ये राजकीय बदल घडवून आणण्याची क्षमता या शक्तीकडे आहे. थेट हस्तक्षेपाऐवजी स्थानिक असंतोषाचा वापर करून सरकारे बदलण्याची रणनीती वापरली जाते,” असे त्यांनी नमूद केले.
भारताच्या संदर्भात त्यांनी इशारा देताना सांगितले की, “या सर्व जागतिक शक्तींचे लक्ष्य भारतासारख्या देशांवर असू शकते. समाजात फूट पाडणे, सांस्कृतिक मुळे कमकुवत करणे आणि विविध गटांमध्ये विभागणी निर्माण करणे हे प्रयत्न सुरू आहेत. ‘डी-हिंदूलाईझेशन’, ‘डिसअॅफेक्शन’, ‘डीरूटिंग’, ‘डिव्हिजन’ आणि ‘डिस्ट्रक्शन’ या टप्प्यांद्वारे समाजावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला जातो. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करत सांगितले की, “जागतिक राजकारण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वरवर दिसणाऱ्या घटनांवर विश्वास न ठेवता त्यांच्या मागील कारणांचा शोध घेतला पाहिजे. हिमनगाचा फक्त वरचा भाग पाहून निर्णय घेऊ नये; पाण्याखालील भाग समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
”संचालिका सौ स्मिता कान्हेरे यांनी सुत्रसंचलन व प्रास्ताविक केले. राजेश भोज यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. अंजली अरुण पतंगे आणि माजी न्यायाधीश प्रतापराव शिंदे हे कार्यक्रमाचे प्रायोजक असल्याने त्यांचा सत्कार सुनील शिंदे यांनी केला. ग्रंथपाल अमित वाडकर यांनी आभार मानले. यावेळी वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




