प्रभातफेरी, जनजागृतीपर मार्गदर्शन आणि थॅलेसेमिया मुक्तीची शपथ - विवाहपूर्व रक्त तपासणीचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर ( प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानांतर्गत वैजापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात १ मे ते ८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘संकल्प सप्ताह’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. थॅलेसेमिया या अनुवंशिक आजाराविषयी समाजात जाणीवजागृती निर्माण करणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश होता.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद हरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयापासून काढण्यात आलेल्या भव्य प्रभातफेरीने झाली. यावेळी डॉ. दीपमाला परदेशी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, थॅलेसेमियासारख्या आजाराला रोखण्यासाठी केवळ जनजागृती हाच प्रभावी उपाय आहे.
सप्ताहाचे अधिकृत उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. पालवे व डॉ. वेदपाठक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सचिन चव्हाण, डॉ. सालुंके, सहाय्यक अधिसेविका रुक्मिणी गवई, इंचार्ज छाया केदारे, विजया जंगम, भागवत सिस्टर, मनिषा रोकडे सिस्टर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात श्री. किशोर वाघुले यांनी थॅलेसेमिया या अनुवंशिक आजारावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, थॅलेसेमिया हा आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. "माता-पिता दोघेही थॅलेसेमिया माइनर असल्यास, जन्मणाऱ्या बालकाला थॅलेसेमिया मेजर होण्याची दाट शक्यता असते. अशा बालकांना आयुष्यभर नियमित रक्त द्यावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी विवाहपूर्व नवदांपत्यांनी शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध असलेली रक्त तपासणी करून घ्यावी," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या आजाराच्या निर्मूलनासाठी महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती, प्रसारमाध्यमे, ब्लड बँका, प्रयोगशाळा आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य मोलाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. रामेश्वर सोनुने यांनी उपस्थितांना थॅलेसेमिया मुक्तीची शपथ दिली.
या यशस्वी उपक्रमासाठी श्याम उचित, मंगेश मापारी, लक्ष्मीकांत दुबे, रवि विणकरे, रविकांत गडकरी, शशिकांत पाटील, शुभम निखाडे, किसन चौधरी, रामेश्वर सोनुने, संजय किर्तीकर, संजय शिराळे, बापू वाळके, भास्कर दुधारे, विजय पाटील तसेच कदम नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर वाघुले यांनी केले. या कार्यक्रमास रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




