अधिकारी व कर्मचाऱ्यांची युद्धपातळीवर मोहीम - मोठा अनर्थ टळला - वीजपुरवठा सुरळीत
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
कुसगाव (ता. वाई) येथील लोकवस्तीतील डिस्ट्रिब्युशन बॉक्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज, १७ मे रोजी सकाळी घडली. मात्र, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्थानिक युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, अवघ्या काही तासांत नवीन बॉक्स बसवून गावातील वीजपुरवठा सुरक्षितपणे पूर्ववत करण्यात आला आहे.
सकाळी कुसगाव गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या डिस्ट्रिब्युशन बॉक्समधून अचानक आगीच्या ज्वाला निघू लागल्या. हा प्रकार गावातील नागरिक नारायण वरे व किरण बगाडे यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तातडीने महावितरणच्या व्याहाळी शाखेचे शाखाधिकारी सागर मगदूम यांना फोनवरून याची माहिती दिली. माहिती मिळताच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून शाखाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित भागाचा वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.
डिस्ट्रिब्युशन बॉक्स पूर्णपणे जळाला असल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्याहाळी शाखेचे शाखाधिकारी सागर मगदूम, कर्मचारी अमर महागडे, अजित ननवरे, तुषार जगताप आणि गुंजन शेंडे यांनी कोणतीही दिरंगाई न करता युद्धपातळीवर काम सुरू केले. तातडीने नवीन डिस्ट्रिब्युशन बॉक्स उपलब्ध करून तो बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. सर्व आवश्यक सुरक्षितता उपाययोजना तपासून दुपारी काही तासांत गावातील वीजपुरवठा सुरक्षितपणे पूर्ववत करण्यात आला. महावितरणच्या या गतिमान आणि तत्पर कामगिरीबद्दल कुसगावच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, "संबंधित डीपी पूर्वी गावाच्या लोकवस्तीपासून दूर होता. मात्र, आता तिथे लोकवस्ती वाढल्याने सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा डीपी इतरत्र सुरक्षित जागेवर हलवणे गरजेचे आहे. यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायतीला कळवले असून, जागा मिळताच स्थलांतराचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ पाठवला जाईल," असे व्याहाळी शाखेचे शाखाधिकारी सागर मगदूम यांनी यावेळी सांगितले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




