वाई तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा फिल्टर बंद

 प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

Administration's negligence, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले असताना वाई तहसील कार्यालयातील नागरिकांसाठी बसवण्यात आलेला पिण्याच्या पाण्याचा फिल्टर गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत धूळ खात पडला आहे. तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून प्रशासनाच्या उदासीन कारभाराबद्दल संतापाची लाट उसळली आहे.

वाई तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातून दररोज शेकडो नागरिक दाखले, महसुली कामे, अर्ज, मंजुरी प्रक्रिया तसेच इतर शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात येत असतात. वाढत्या उकाड्यात शेतकरी,लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना पिण्याच्या स्वच्छ व थंड पाण्याची सुविधा मिळणे अत्यावश्यक असताना तहसील प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेला फिल्टर आज एका कोपऱ्यात भंगारासारखा पडून आहे. फिल्टरच्या परिसरात धुळीचे थर साचले असून त्याच्या देखभालीकडे संबंधित विभागाचे स्पष्ट  दुर्लक्ष असल्याचे  दिसून येत आहे. “जनतेसाठी योजना आणि सुविधा” अशा मोठमोठ्या घोषणा करणारे प्रशासन प्रत्यक्षात मात्र सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.

विशेष म्हणजे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित केबिन, थंड पाण्याच्या जारची व्यवस्था उपलब्ध असताना तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला साधे पिण्याचे पाणीही मिळू नये, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या  नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 “लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी परिस्थिती तहसील प्रशासनाची झाल्याची बोचरी टीकाही नागरिकांनी केली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने तात्काळ बंद पडलेला पाण्याचा फिल्टर दुरुस्त करून सुरू करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. आता तरी वाई तहसील प्रशासन  झोपेतून जागे होऊन जनतेच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देणार का, याकडे संपूर्ण  तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !