महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रयोग - प्रशिक्षणानंतर भव्य रोजगार मेळाव्याचेही आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी महाराष्ट्रात प्रथमच 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (Artificial Intelligence - AI) आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांना केवळ तंत्रज्ञान शिकवले जाणार नाही, तर त्यानंतर खास रोजगार मेळावा भरवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याची ग्वाही सभापती सौ. ऋतुजा विराज शिंदे यांनी दिली.
शेतीपासून मार्केटिंगपर्यंत 'AI' ची साथ
या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी AI चा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन दिले जाईल. विशेषतः शेती क्षेत्रात आधुनिक अवजारे, खते आणि त्यांच्या अचूक वापरासाठी तंत्रज्ञानाची मदत कशी घेता येईल, हे शिकवले जाईल. यासोबतच, महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे 'डिजिटल मार्केटिंग' करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठी झेप घेता येईल.
डिजिटल सुरक्षा आणि आर्थिक साक्षरता
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, महिलांची फसवणूक टाळण्यासाठी 'सायबर क्राईम'पासून बचावाचे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. तसेच टॅक्सेशन, अकाउंटिंग आणि फोन बँकिंग यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करून महिलांना आर्थिक व्यवहारात चोख बनवण्याचा मानस समितीने व्यक्त केला आहे.
बालकांच्या आरोग्यासाठी 'साखरमुक्त' पाऊल
या पत्रकार परिषदेत एक महत्त्वाचा आरोग्यदायी निर्णय जाहीर करण्यात आला. अंगणवाडीतील पोषण आहारामध्ये गव्हाच्या खिरीसाठी आता साखरेऐवजी पौष्टिक गुळाचा वापर केला जाणार आहे. साखरेतील सल्फर बालकांसाठी अपायकारक ठरू शकते, हे लक्षात घेऊन हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
स्मार्ट आणि डिजिटल (AI) अंगणवाडी संकल्पना
केवळ महिलाच नव्हे तर बालकांसाठीही जिल्हा परिषद 'स्मार्ट' पावले उचलत आहे. आता 'डिजिटल AI अंगणवाडी' संकल्पना राबवण्यात येणार असून, स्मार्ट टीव्ही आणि अत्याधुनिक शैक्षणिक संचाद्वारे बालकांना शिक्षण दिले जाईल. AI च्या मदतीने मुलांचे आरोग्य आणि आहाराची गुणवत्ता डिजिटल पद्धतीने ट्रॅक केली जाणार आहे.
स्वसंरक्षणासाठी 'राणी लक्ष्मीबाई' योजना
मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न विचारात घेऊन 'राणी लक्ष्मीबाई' योजनेअंतर्गत जिल्ह्यात ज्युडो-कराटे प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येणार असल्याचेही ऋतुजा शिंदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शैलजा शिंदे, सारिका फाळके, अलका जगदाळे, पूजा मोरे, विजया थोरात, मृणाल पाटील, छाया जाधव, राजेश्वरी भोसले आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे उपस्थित होते.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




