वाई पोलिसांची प्रभावी कामगिरी, न्यायालयाने ठोठावला दंड, पीडितेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी, शुभम कोदे)शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा मानसिक व विनयभंग वजा छळ करणाऱ्या दोन आरोपींना वाई न्यायालयाने आज ६ महिने साधी शिक्षा आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वाई पोलीस ठाण्याच्या अचूक तपासामुळे आणि सक्षम पैरवीमुळे आरोपींना न्यायालयाकडून ही अद्दल घडली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
वाई येथील रहिवासी असलेले आरोपी फैज दानिश शेख व शाहरुख उर्फ बबलू सत्तार पटेल (रा. पटेल वाडा, वाई) हे दोघे पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत येत-जात असताना तिचा सातत्याने पाठलाग करत असत. २६ मार्च २०१६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास, तसेच त्यापूर्वीही वेळोवेळी आरोपींनी मुलीला अडवून, "इधर आ, तू मेरेसे क्यू बात नही करती, हमसे बात करती जा," असे म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.
या त्रासाला कंटाळून पीडितेच्या कुटुंबीयांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १०३/२०१७ अन्वये भारतीय दंड विधान (IPC) कलम ३५४(अ), ३४ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयातील सुनावणी आणि साक्ष
या संवेदनशील प्रकरणाचा तपास तत्कालीन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी केला होता. हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय डी. बी. माने यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील एम. यू. शिंदे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यादरम्यान एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली, जी आरोपींना दोषी धरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.
(Two 'Road Romeos' Sentenced to 6 Months of Rigorous Imprisonment for Harassing a Minor Girl)
न्यायालयाचा अंतिम निकाल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आज (२८ मे) दोन्ही आरोपींना दोषी ठरवले.
न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
कारावास: दोन्ही आरोपींना प्रत्येकी ६ महिने साधी शिक्षा
दंड: प्रत्येकी २ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त साधा कारावास)
नुकसानभरपाई: पीडितेच्या वडिलांना १२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने आरोपींना दिले आहेत.
खाकीची तत्परता, वाई पोलिसांचे कौतुक
हा खटला तडीस नेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (वाई) सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार (ब. नं. २००८) कदम यांनी प्रभावी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. वाई पोलिसांच्या या दक्ष तपासाचे आणि मजबूत न्यायालयीन कामकाजाचे सर्वत्र कौतुक होत असून, रोडरोमियोंना कायद्याचा वचक बसेल असा हा निकाल ठरला आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



