ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी व ह. पीर साहेब यांची यात्रा उत्साहात
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
मलकापूर येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी व ह. पीर साहेब यांची यात्रा यावर्षीही अत्यंत उत्साहात आणि विविध धार्मिक व क्रीडा उपक्रमांनी संपन्न झाली. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या जंगी कुस्त्यांच्या मैदानात मलकापूरचा सुपुत्र पै. सरकार पवार याने 'कराड दक्षिण केसरी' आणि मलकापूरच्या मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले.
सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. उपस्थित कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्यांमध्ये पुण्याच्या हनुमान आखाड्याचा पै. धनाजी कोळी याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी सैदापूर हिंदकेसरी आखाड्याचा सिद्धेश साळुंखे हा ठरला, तर तृतीय क्रमांक पुणे येथील हनुमान आखाड्याचा पै. ओंकार कोकाटे याने मिळवला.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष व यात्रा कमिटीचे मार्गदर्शक अशोकराव थोरात यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या कुस्त्यांचे नेटके नियोजन करण्यात आले होते. यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजितकाका थोरात, उपाध्यक्ष राजू मुल्ला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आखाड्याचे शिस्तबद्ध संचलन केले.
यावेळी कराड पोलीस दलाचे कर्मचारी, परिसरातील कुस्ती शौकीन, अनुभवी पंच आणि मलकापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. "ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि युवकांच्या उत्साहामुळे ही परंपरा अधिक वृद्धिंगत होत आहे," अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सचिव सुधाकर शिंदे, दिग्विजय शिंदे, पंडित शिंदे, राहुल शिंदे, आबासाहेब शिंदे, दीपक बोरगे, पोलीस पाटील प्रशांत गावडे यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




