क्रांतीज्योती सावित्री जयंती उत्सव समिती शिरूर यांच्या वतीने विशेष कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीचे औचित्य साधून शिरूर येथे 'ज्योती सावित्री जयंती उत्सव समिती'च्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना 'आम्ही शिरूरकर फाउंडेशन'चे अध्यक्ष रवींद्र सानप यांनी समाजात वाढत्या अंधश्रद्धेवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "आज देशभरात आणि महाराष्ट्रात अनेक नागरिक, विशेषतः महिला अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. दररोज वर्तमानपत्रे, टीव्ही आणि मोबाईलच्या माध्यमातून महिलांची होणारी फसवणूक समोर येत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे."
सानप यांनी पुढे नमूद केले की, "जर आपण महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुस्तके वाचली असती आणि त्यांचे विचार अंगीकृत केले असते, तर आज समाजावर ही वेळ आली नसती. फुले दांपत्याने १७५ वर्षांपूर्वी रूढी-परंपरा आणि पिळवणुकीविरुद्ध जो लढा दिला, तो आजही तितकाच प्रासंगिक आहे. त्यांच्या त्यागाचे विस्मरण होऊ न देता सत्यशोधक पद्धतीने जीवन जगणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."
या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महीबुब सय्यद, राजू खेतमाळीस, रविराज लेंडे, लौकिक बोरा, सचिन नेवसे, गोपीनाथ पठारे, मेजर नारायण पाचंगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिरूर परिसरात या प्रबोधनात्मक विचारांची मोठी चर्चा होत आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




