सातारा सिव्हिल हॉस्पिटलचा शिपाई ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई

सोनोग्राफी व गर्भपात केंद्राच्या परवान्यासाठी मागितली होती लाच

Health employees cought in anti corruption trap, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी मोठी कारवाई केली. रुग्णालयातील एका शिपायाला तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
या प्रकरणातील तक्रारदार यांचे भागीदारीमध्ये एक हॉस्पिटल आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर, सरकारमान्य गर्भपात केंद्र आणि कुटुंब नियोजन केंद्र या सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले शासकीय परवाने मिळवण्याकरिता त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे प्रस्ताव दाखल केला होता. हे प्रकरण जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. करपे यांच्याकडे प्रलंबित होते. या परवान्यांच्या कामासाठी सिव्हिल सर्जन यांचे शिपाई आनंदा गोपाळ वाळवेकर (वय ५८) यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत ९ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.

एसीबीचा सापळा आणि कारवाई
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने मार्च आणि एप्रिल महिन्यात विविध तारखांना या तक्रारीची पडताळणी केली. १६ मार्च रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत, शिपाई आनंदा वाळवेकर याने डॉ. करपे यांच्यासाठी ५० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

शुक्रवारी, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी एसीबीने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सापळा रचला. आरोपी वाळवेकर याने तक्रारदाराकडून परवान्याची प्रमाणपत्रे देऊन ५० हजार रुपये स्वीकारले. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
आरोपी आनंदा वाळवेकर याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई पुणे ला.प्र.वि. परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि सातारा ला.प्र.वि.चे पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सुप्रिया गावडे, तसेच कर्मचारी गणेश ताटे, निलेश राजपुरे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे आणि चालक महेश पुजारी यांचा समावेश होता.

नागरिकांना आवाहन
"शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा," असे आवाहन सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !