दहावीच्या पेपरच्या दिवशीच काळाचा घाला - क्रीडा क्षेत्रातील चमकता तारा निखळल्याने हळहळ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या पसरणी (ता. वाई) गावावर आज दुःखाचा डोंगर कोसळला. गावातील प्रतिष्ठित कारभारी घराण्यातील मनोज गुलाबराव महांगडे (कारभारी) यांचे चिरंजीव अथर्व मनोज महांगडे (वय १६) याचे आज सकाळी पोहत असताना अचानक चक्कर आल्याने दुर्दैवी निधन झाले. विशेष म्हणजे, आजच त्याचा दहावीचा पेपर होता, मात्र परीक्षेला जाण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर झडप घातली.
अथर्व हा पसरणी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. अभ्यासात हुशार आणि स्वभावाने अत्यंत नम्र असलेला अथर्व हा एक उत्तम खेळाडू होता. त्याने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत अनेक पदके पटकावली होती. त्याच्या या यशाबद्दल गावात त्याचे नेहमीच कौतुक व्हायचे. भविष्यात क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घेण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
अथर्वचे वडील बँकेत कार्यरत असून आई रयत शिक्षण संस्थेच्या हुमगाव (ता. जावळी) येथील विद्यालयात शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. घरातील लाडक्या आणि गुणवंत मुलाच्या अशा अकाली जाण्याने महांगडे कुटुंबावर आभाळ फाटले आहे.
"अथर्व केवळ एक विद्यार्थी नव्हता, तर पसरणी विद्यालयाचा आणि गावाचा अभिमान होता. त्याच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे," अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
आज सकाळी ही वार्ता समजताच संपूर्ण पसरणी गावावर शोककळा पसरली. दहावीच्या परीक्षेच्या धांदलीत असलेल्या त्याच्या मित्रपरिवाराला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. सर्व स्तरातून अथर्वला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
ईश्वर त्याच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि महांगडे कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




