हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाबळेश्वर-पोलादपूर रोडवर बेकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग, साताराच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कुंभारोशी आणि जावळी (ता. महाबळेश्वर) या दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ७५ वर्षीय वृद्ध महिलेसह एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला 'आपले सरकार' पोर्टलवरून मिळालेल्या तक्रारीनुसार, कुंभारोशी गावच्या हद्दीत हॉटेल विजयच्या पाठीमागे मोकळ्या जागेत धाड टाकण्यात आली. यावेळी प्रभावती बळवंत शेटे (वय ७५ वर्षे) या बेकायदेशीर देशी दारूची विक्री करताना आढळल्या असून दुसरी कारवाई जावळी (पो. कुंभारोशी) येथे करण्यात आली. लक्ष्मण झिंगू मोरे याच्या घरामागील मोकळ्या जागेत बेकायदेशीर मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या छाप्यात लक्ष्मण झिंगू मोरे (वय ५७ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून जवळपास १२ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सातारा भरारी पथकाचे निरीक्षक एम. एस. चव्हाण आणि दुय्यम निरीक्षक व्ही. एम. मराड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. महाबळेश्वर परिसरात अवैद्य मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा विभागाने दिला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




