१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
"तुमचा ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावून देतो आणि दरमहा ३० हजार रुपये मिळवून देतो," असे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका २३ वर्षीय भामट्याला वाई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून १० लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजय संतोष चव्हाण (वय २३, रा. सरताळे, ता. जावली, जि. सातारा) याने आपली ओळख एजेंट म्हणून करून दिली होती. त्याने तक्रारदार निखिल तानाजी धुमाळ (वय ३४, रा. नायगाव, ता. कोरेगाव) आणि प्रशांत बबन सोळस्कर यांचा विश्वास संपादन केला.
सोनगिरवाडी (वाई) येथे नोटरी करून, "तुमचे ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावतो आणि प्रत्येक महिन्याला ३० हजार रुपये भाडे देतो," असे खोटे सांगून त्याने दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. यामध्ये कुबोटा ट्रॅक्टर (क्र. MH 11 DN 9524) आणि ट्रॅक्टर (क्र. MH 11 DF 4514) यांचा समावेश होता. ट्रॅक्टर ताब्यात घेतल्यावर आरोपीने आपला मोबाईल बंद करून पोबारा केला होता.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबधित शेतकऱ्यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अजय चव्हाण याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून फसवणूक करून नेलेले १० लाख रुपये किमतीचे दोन्ही ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सपोनि अमोल गवळी, फौजदार सुधीर वाळुंज आणि नितीन कदम, हेमंत शिंदे, स्नेहल सोनावणे, विक्रम धोत्रे, श्रवण राठोड, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान, "कोणालाही आपले वाहन किंवा मौल्यवान वस्तू भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती घ्या. केवळ कागदोपत्री करारावर विसंबून न राहता प्रत्यक्ष शहानिशा करा." असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




