अत्यंत दुःखदायक - डॉ. डी. डी. कोथळकर यांचे निधन
शिवशाही वृत्तसेवा भोकरदन (प्रतिनिधी मजहर पठाण)
बुलढाणा शहरातील प्रसिद्ध व ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. डी. कोथळकर यांचे १ मार्च रोजी वृद्धापकाळाने शांत झोपेत निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, कालच त्यांच्या एमबीबीएस बॅचचा गेट-टुगेदर कार्यक्रम पार पडला होता. कार्यक्रम आटोपून ते रात्री उशिरा घरी परतले होते. सकाळी नित्यनेमाप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी ते उठले नाहीत. त्यांचे सुपुत्र डॉ. अमोल कोथळकर यांनी खोलीत जाऊन पाहिले असता ते निपचित अवस्थेत आढळले. झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. अमोल कोथळकर, सुना, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.
स्वभावाने मृदू, मनाने अत्यंत संवेदनशील आणि रुग्णसेवेला समर्पित असलेल्या डॉ. कोथळकर यांनी अनेक वर्षे बालरोगतज्ज्ञ म्हणून निःस्वार्थ सेवा दिली. गरीब व गरजू रुग्णांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. त्यांच्या निधनाने धावडा व परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, धावडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने दिनांक ०२/०३/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला धावडा ग्रामपंचायतचे प्रशासक सरपंच गंगुबाई तुकाराम बोराडे, कमिटी मेंबर इकबाल खान पठाण, डॉ. प्रमोद कुलकर्णी, बेलअप्पा पिसोळे, दिलीप वाघ, जुमान चाऊस, रामराव पवार, दिनेश देवकर, माणिक सुरसे, पंजाबराव देशमुख, गयास सेट, नजीर खान, प्रमोद फुसे, कृष्ण गवळी, विजू बापू देशमुख, सोमनाथ घोडके, अजिस शेठ पठाण, सुरज फुसे, शुभम देशमुख, अक्षय अनवेकर, विकास पाटील, शिंपड देवकर, शिवारी कोथकर, दगडू बीर, दिलीप पेंटर, पत्रकार मुस्तफा पठाण, पत्रकार मजहर पठाण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप देवकर व विजय देवकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी डॉ. कोथळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेकांनी सांगितले की, “डॉक्टरांनी केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर समाजात माणुसकीची शिकवण दिली.”
शोकसभेच्या शेवटी त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




