राष्ट्रवादीसमोर भाजपची ताकद कमी पडली
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
मतदारांचा कौल अजितदादांच्या नेतृत्वाला
वाई तालुका हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पद जिंकत मोठी एन्ट्री केली होती. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजपकडून बालेकिल्ला भेदण्याचा जोरदार प्रयत्न झाला. जयकुमार गोरे यांनी प्रचारादरम्यान विविध घोषणा व आश्वासनांचा पाऊस पाडला होता; मात्र प्रत्यक्ष मतदानातून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उलट मतदारांनी मतदानाच्या रूपाने अजितदादांवरील निष्ठा व्यक्त करत राष्ट्रवादीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यात भाजप अपयशी ठरल्याचे निकालातून अधोरेखित झाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखत ४ पैकी ३ गट आणि ८ पैकी ५ गण जिंकले, तर भाजपला १ गट व ३ गणांवर समाधान मानावे लागले. स्थानिक पातळीवरील संघटन, कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले, अशी राजकीय चर्चा सध्या तालुक्यात रंगलीआहे
यशवंतनगर गट व गण
शिंदे दिनकर महादेव (राष्ट्रवादी) १९३५ मतांनी विजयी, डोंगरे विक्रांत विठ्ठल (राष्ट्रवादी) २७०९ मतांनी विजयी, गायकवाड स्वप्निल अशोक (भाजप) २४४१ मतांनी विजयी.
बावधन गट व गण
शिंदे ऋतुजा विराज (राष्ट्रवादी) ३७७७ मतांनी विजयी, जगताप वर्षालाल सिंग (राष्ट्रवादी) ५४६४ मतांनी विजयी, सचिन आप्पासो भोसले (भाजप) ३६७ मतांनी विजयी.
ओझर्डे गट व गण
वृषाली ललित चव्हाण (राष्ट्रवादी) ८६०८ मतांनी विजयी, शैलेश नामदेव सपकाळ (राष्ट्रवादी) २६०१ मतांनी विजयी, हर्षदा सुधीर फरांदे (राष्ट्रवादी) ४२७० मतांनी विजयी.
भुईंज गट व गण
बाबर दिलीप ज्ञानोबा (भाजप) ८३३ मतांनी विजयी, भोसले सुरभी मदन (भाजप) ८९४ मतांनी विजयी, राणी कांतीलाल पवार (राष्ट्रवादी) १५५० मतांनी विजयी.
तालुक्यातील एकूण बलाबल
राष्ट्रवादी गट – ३ | राष्ट्रवादी गण – ५
भाजप गट – १ | भाजप गण – ३
एकूणच, नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष जिंकूनही भाजपला तालुक्यातील ग्रामीण राजकारणात अपेक्षित यश मिळाले नाही. मतदारांनी दिलेला हा कौल राष्ट्रवादीच्या पारंपरिक बालेकिल्ल्याची ताकद कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



