भुईंज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ४ दरोडेखोर जेरबंद
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
पुणे-सातारा महामार्गावर पेट्रोल पंपावरील कामगारांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीचा भुईंज पोलिसांनी थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून धारदार शस्त्रे आणि कारसह तब्बल १० लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
्दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि पृथ्वीराज ताटे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीत करुणा मंदिरासमोर काही लोक अंधारात संशयास्पद रित्या दबा धरून बसले आहेत. हे लोक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचला.
साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने रात्री ३:१५ वाजता या टोळीला वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच पाच जणांच्या टोळीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने चौघांना झडप घालून पकडले, तर त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
पकडण्यात आलेल्या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन तीक्ष्ण कोयते, एक कटावणी (घरफोडीचे साधन), मिरची पूड, तीन मोबाईल फोन आणि एक एर्टिगा कार या वस्तू आढळून आल्या आहेत.
अमित बजरंग चव्हाण (वय २८, रा. खेडशिवापूर), सुफियान मुस्तफा मुजाहिद (वय ३०, रा. खेडशिवापूर), सुरज महादेव जाधव (वय १९, रा. खेडशिवापूर) आणि एक विधीसंघर्षित बालक (अल्पवयीन) अशी अटक केलेल्यांची नावे असून प्राथमिक तपासात या टोळीने मेढा भागातील डीपी चोरीचा गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्याकडून महामार्गावरील डिझेल चोरी, घरफोडी आणि इतर मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भुईंज पोलीस पथकाचे या धाडसी कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




