खावलीत बापूसाहेब शिंदे यांची प्रचार सभा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाईच्या पश्चिम भागातील खावली येथे जिल्हा परिषद यशवंतनगर गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकनेते बापूसाहेब शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेत बोलताना बापूसाहेब शिंदे यांचे पुत्र विकास शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
विकास शिंदे म्हणाले, “आपल्या भागासाठी खऱ्या अर्थाने लढणारी, आपल्या माणसातली व्यक्ती म्हणून लोकनेते बापूसाहेब शिंदे यांना जिल्हा परिषदेचे तिकीट मिळाले आहे. हे तिकीट केवळ पक्षाचे नाही, तर सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासातून आणि परवानगीने मिळालेले आहे.”
पश्चिम भागात सक्षम नेतृत्वाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “आज संपूर्ण पश्चिम भागात लोकनेते बापूसाहेब शिंदे आणि आबा हे दोनच खरे सक्षम नेते आहेत. त्यामुळेच प्रत्येक गावोगावी, वाडी-वस्तीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे.
एकजुटीने काम करून संपूर्ण भागात शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस कशी उभी राहील, यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत. या भागात माध्यमांव्यतिरिक्त भाजपचा कुठेही प्रचार दिसत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
लोकनेते बापूसाहेब शिंदे यांना निवडून दिल्यास पश्चिम भागाचा विकास अटळ असल्याचा विश्वास व्यक्त करत विकास शिंदे म्हणाले, “मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून यशवंतनगर गटाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”
या प्रचार सभेला परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमुळे खावलीसह संपूर्ण पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



