जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
बावधन जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ऋतुजाताई विराज शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे ठाम आवाहन बाजार समितीचे चेअरमन मोहन जाधव यांनी केले.
यावेळी बोलताना मोहन जाधव म्हणाले, “आमच्या शेंदुरजणे गणाला गेल्या अनेक वर्षांपासून कधीही उमेदवारी मिळाली नव्हती.आजवर शेंदूरजणे गणाने बावधन गावातील अनेक उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.बावधन गावाला आमचा मोठा भाऊ समजून आम्ही कायमच लहान भावाची साथ बावधनकरांना दिली.यावेळी शेंदूरजणे गणाला पहिल्यांदाच बावधन गाव आणि गणातील कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे.याबद्दल बावधनकरांचे मानावेत तेव्हढे आभार कमी आहेत.बावधनकरांनी घेण्याची भूमिका बदलून देण्याची भूमिका स्वीकारल्याने शेंदूरजणे गण सर्व गट तट विसरून एकत्र आला आहे.ऋतुजाताई शिंदे यांना मिळालेल्या उमेदवारी आम्हा शेंदूरजणे आणि बावधन गणाचा सन्मान असून या संधीचे आम्ही सोनं करून दाखवू.राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील आणि गणातील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू,असा विश्वासही मोहन जाधव यांनी व्यक्त केला. आपल्या मतदारांचे मत हे “खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित दादांना दिलेली श्रद्धांजली होईल,” असे भावनिक विधान त्यांनी यावेळी केले.
“1947 सालापासून शेंदुरजणे गणाने देण्याची भूमिका घेतली होती.आता या भागाला पहिल्यांदाच ऋतुजा शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.शेंदूरजणे गणातील मतदारांनी यावेळी राष्ट्रवादीला मतदान करून पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन इतिहास घडवा,” असे भावनिक आवाहन जाधव यांनी कार्यकर्त्यांना केले.
ऋतुजाताई शिंदे यांच्या रूपाने बावधन गटाचा आणि शेंदुरजणे गणाचा सर्वांगीण विकास होणार असून विराज शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क व मकरंद आबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणि विकासकामे आपल्या भागात आणली जातील, असा ठाम विश्वासही मोहन जाधव यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा परिषद उमेदवार ऋतुजाताई शिंदे, शेंदुरजणे गणाच्या उमेदवार वर्षाताई जगताप, बावधन गणाचे पंचायत समिती उमेदवार विक्रम तात्या पिसाळ उपस्थित होते. तसेच शिंदे मेणवलीचे उपसरपंच संजय चौधरी, बाजार समितीचे संचालक केशव गाढवे तुकाराम जेधे, माजी उपसभापती शंकर शिंदे, रतनसिंह शिंदे, अविनाश गाढवे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेमुळे बावधन व शेंदुरजणे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



