रस्त्याचा ठेकेदार 'धुळफेक' करतोय की प्रशासन झोपलंय?
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई तालुक्यातील पश्चिम भागातील जीवनवाहिनी मानला जाणारा आणि जोर-जांभळी खोऱ्याला जोडणारा धोम धरणालगतचा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, प्रत्यक्षात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा आणि कासवगती यामुळे स्थानिकांच्या संयमाचा बांध आता सुटत चालला आहे.
गेल्या काही काळापासून या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे आणि मातीमुळे परिसरात धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालकांना रस्ता शोधणे कठीण झाले असून, परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार जडू लागले आहेत. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था 'नरकयातना' देणारी असते, मात्र उन्हाळ्यातही ही धूळ जनतेचा जीव घेत आहे.
"निवडणूक आली की प्रमुख नेते या भागात येतात, आश्वासनांची गाजरे दाखवतात. पण काम सुरू झाल्यावर मात्र सर्वच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन उदासीन का?" असा संतप्त सवाल पश्चिम भागातील नागरिक विचारत आहेत. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असली, तरी कामाचा दर्जा पाहता हे काम टिकणार की पुन्हा पहिल्या पावसात वाहून जाणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
ठेकेदाराची मनमानी की सरकारची तिजोरी रिकामी?
या दुरवस्थेला जबाबदार कोण? संबंधित ठेकेदार आपल्या मर्जीनुसार निकृष्ट साहित्य वापरून काम उरकत आहे का? की शासनाकडून निधीचा तुटवडा असल्याने हे काम रेंगाळले आहे? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मात्र कारण काहीही असले, तरी त्याचा नाहक त्रास मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.
आम्ही फक्त कर भरायचा आणि धूळ खायची का? जर रस्त्याचे काम दर्जेदार आणि जलद गतीने झाले नाही, तर पश्चिम भागातील जनता रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहेत, तर जमिनीवर जनता धुळीत माखत आहे. आता पश्चिम भागातील जनतेने 'आक्रमक पवित्रा' घेतला असून, प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाची झोप उडणार की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार? हे आता येणारा काळच ठरवेल.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



