साहित्य संमेलनातील धक्कादायक प्रकार
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
राज्यातील प्रतिष्ठित साहित्य संमेलनाला आज लज्जास्पद गालबोट लागले. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला थेट काळे फासण्यात आल्याने संपूर्ण संमेलन परिसरात एकच खळबळ उडाली. साहित्य, विचार आणि अभिव्यक्तीचे व्यासपीठ असलेल्या संमेलनात घडलेल्या या हिंसक आणि असंस्कृत कृत्यामुळे साहित्यविश्वात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आंदोलक संदीप जाधव याने नियोजनबद्ध गनिमी कावा करत संमेलनाच्या ठिकाणी प्रवेश केला आणि अचानकपणे विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले. हा प्रकार इतक्या झपाट्याने घडला की उपस्थित सुरक्षा यंत्रणांनाही काही क्षण परिस्थितीचा अंदाज घेता आला नाही. कार्यक्रम सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे संमेलनाची शिस्त, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
काळे फासण्यासाठी वापरण्यात आलेल्या केमिकलमुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्यास तीव्र त्रास झाला. घटनेनंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती असून तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. एका साहित्यिक कार्यक्रमात अशा प्रकारे केमिकलचा वापर होणे हे अत्यंत गंभीर आणि धोकादायक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलक संदीप जाधव याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आंदोलनामागील नेमका उद्देश, नियोजन आणि संभाव्य सहकारी यांचा सखोल तपास केला जात आहे. या घटनेने संमेलनाच्या सुरक्षेवर तसेच आयोजकांच्या नियोजनावर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
साहित्यिक विचारमंथनाच्या मंचावर अशा प्रकारचे अराजक, हिंसक आंदोलन होणे हे लोकशाही मूल्यांना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काळीमा फासणारे असल्याची तीव्र प्रतिक्रिया विविध साहित्यिक, विचारवंत आणि उपस्थित नागरिकांकडून उमटत आहे. साहित्य संमेलनासारख्या सुसंस्कृत व्यासपीठाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



