सुदैवाने जीवितहानी नाही,मात्र तिघेजण जखमी
शिवशाही वृत्तसेवा,भोकरदन ( प्रतिनिधी मजहर पठाण )
भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अजिंठा–बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर अनवेकर पेट्रोल पंपासमोर आज सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघेजण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी (क्रमांक MH15 GL 7886) ही धावडाहून बुलढाण्याकडे जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला. त्याच वेळी बुलढाण्याकडून शिवणाकडे जाणारी होंडा कंपनीची चारचाकी गाडी (क्रमांक MH04 FR 3777) समोरून येत होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की रस्त्याच्या कडेला चिकन घेण्यासाठी उभा असलेला एक व्यक्तीही या अपघातात जखमी झाला. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकी वाहनांनाही या धडकेत मोठा फटका बसून त्या काही अंतरावर ओढल्या गेल्या.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या परिसरात खुलेआम अवैध देशी दारूची दुकाने सुरू असून, महामार्गालगत रस्त्याच्या कडेला थेट दारू विक्री होत आहे. दारूच्या दुकानामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी, वाहतूक कोंडी व गोंधळाचे वातावरण असते. स्थानिक नागरिकांच्या मते, याच कारणामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत.
असे असतानाही संबंधित पोलीस प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अवैध दारू विक्रीवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














