पीएफ–ईएसआय न भरल्यास सोमवारी पुन्हा रस्त्यावर उतरणार : स्वप्निल गायकवाड
माजी नगराध्यक्ष अनिल सावंत व भाजप शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांच्या मध्यस्थीने आंदोलन तूर्तास स्थगित
वाई नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पीएफ व ईएसआयसारख्या कायदेशीर सुविधा थकवल्याच्या निषेधार्थ संबंधित NDK कंपनी विरोधात शनिवारी किसनवीर चौकात जोरदार ‘काम बंद’ आंदोलन करण्यात आले. संतप्त कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत प्रशासन व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र निदर्शने केली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील अनेक महिन्यांचे पगार NDK कंपनीकडून अद्याप देण्यात आलेले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही वेतन मिळत नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी काम थांबवून रस्त्यावर उतरण्याचा निर्णायक पवित्रा घेतला. कर्मचाऱ्यांनी किसनवीर चौकात नवीन घंटागाडीचे ट्रक रांगेत उभे करून त्यांच्या समोरच धरणे आंदोलन केले.
थकीत पगार तात्काळ देण्यात यावेत, पीएफ व ईएसआयची रक्कम संबंधित खात्यात जमा करावी तसेच यापुढे वेळेवर वेतन मिळावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. पगार न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचे विदारक चित्र यावेळी पाहायला मिळाले.
या आंदोलनामुळे शहराच्या स्वच्छतेच्या कामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, स्वप्निल भाई गायकवाड, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत व भाजपचे शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांच्या मध्यस्थीने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, सोमवारपर्यंत संबंधित ठेकेदाराने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पीएफ, ईएसआय व थकीत वेतनाबाबत ठोस खुलासा करून देणे आवश्यक असून, अन्यथा सोमवारी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामुळे नगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता नगरपालिका प्रशासन व NDK कंपनी कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण वाई शहराचे लक्ष लागले आहे. या आदोलन स्थळी माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, भाजपचे शहराध्यक्ष विजय ढेकाणे, शिवसेना नेते योगेश फाळके व मराठा महासंघाचे विक्रम वाघ , अमित वनारसे, सचिन मानकुंबरे, स्वप्निल भिलारे आदिनी भेट दिली
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














