ग्रामीण पोलिसांची तत्पर कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, वैजापुर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील दामिनी पथक प्रमुख सपोनि श्रीमती सरला गाडेकर यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, खुलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील मौजे देवळाना, नवीन कॉलनी शेत शिवार येथे दिनांक 25/12/2025 रोजी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार आहे. सदर माहिती खात्रीशीर असल्याने तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.
मा. अन्नपूर्णा सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार दामिनी पथकाच्या सपोनि सरला गाडेकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तेथे विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण तयारी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर दामिनी पथकाने मुलीच्या आई-वडिलांशी संवाद साधून सखोल चौकशी केली असता, नात्यातीलच एका मुलाकडून लग्नाची मागणी आल्याने मुलीचा विवाह लावून देत असल्याचे पालकांनी मान्य केले.
दरम्यान, सपोनि सरला गाडेकर यांनी मुलीचे शैक्षणिक कागदपत्रे व इतर पुराव्यांच्या आधारे वयाची खातरजमा केली असता सदर मुलीचे वय 16 वर्षे 09 महिने असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ती कायदेशीरदृष्ट्या अल्पवयीन असल्याची बाब पालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
यानंतर दामिनी पथक व चाइल्डलाईनचे समुपदेशक श्री. सचिन दौड यांनी पालक व नातेवाईकांचे सविस्तर समुपदेशन केले. यावेळी बालविवाहाचे दूरगामी व गंभीर परिणाम समजावून सांगण्यात आले. बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहते, बालवयात मातृत्व आल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, कुपोषण, मानसिक ताणतणाव, कौटुंबिक हिंसाचाराचा धोका वाढतो तसेच मुलीच्या सर्वांगीण विकासावर कायमस्वरूपी विपरीत परिणाम होतो, ही बाब ठळकपणे समजावून सांगण्यात आली.
तसेच बालविवाह हा केवळ सामाजिक अपराध नसून कायदेशीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत जाणूनबुजून बालविवाह ठरविणे, त्यास प्रोत्साहन देणे किंवा विवाह सोहळा पार पाडणे यासाठी दोन वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, अशी कायदेशीर माहिती पालकांना देण्यात आली.
समुपदेशनामुळे पालकांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी सदर विवाह न करण्याचे लेखी व तोंडी मान्य केले. तसेच मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिच्या इच्छेनुसारच विवाह करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याबाबत चाइल्डलाईनचे समुपदेशक श्री. सचिन दौड यांनी पालकांकडून बंधपत्र लिहून घेतले असून, सदर मुलीस बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून यापूर्वीही अशा अनेक प्रकरणांत संवेदनशील, समजूतदार व कठोर भूमिका घेत बालविवाह रोखण्यात आले असून, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामीण पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे.
यावेळी पालक व नातेवाईकांना मुलींना शिक्षण, स्वावलंबन व आत्मनिर्भरतेकडे प्रवृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षणामुळेच मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहून समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात, असे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कारवाई मा. डॉ. विनयकुमार मे. राठोड, पोलीस अधीक्षक व मा. अन्नपूर्णा सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे सपोनि सरला गाडेकर, पोह. दिलीप साळवे, पो.ना. कपिल बनकर, म.पो.अं. भाग्यश्री चव्हाण, शीतल क्षीरसागर, चाइल्डलाईन समुपदेशक सचिन दौड तसेच खुलताबाद पोलीस ठाण्याचे ASI वारे यांनी यशस्वीरीत्या केली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



