बौद्धिक संपदा हक्कांमुळे नवीन कल्पना व नवसर्जनाला चालना
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( प्रतिनिधी मनोज चव्हाण )
कन्नड : शिवाजी महाविद्यालय, कन्नड येथे दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights – IPR) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व, प्रकार व नोंदणी प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथील प्राध्यापक नितीन भोगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी बौद्धिक संपदा हक्कांची संकल्पना स्पष्ट करताना पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, डिझाईन तसेच भौगोलिक चिन्ह (GI) या प्रमुख प्रकारांची माहिती दिली. नवीन शोध व तंत्रज्ञानासाठी पेटंट, साहित्यिक व कलात्मक निर्मितीसाठी कॉपीराइट, उत्पादने व सेवांसाठी ट्रेडमार्क, उत्पादनाच्या बाह्य रचनेसाठी डिझाईन आणि विशिष्ट भौगोलिक उत्पत्तीशी संबंधित उत्पादनांसाठी GI यांचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
बौद्धिक संपदा हक्कांमुळे नवीन कल्पना व नवसर्जनाला चालना मिळते, निर्मात्यांना त्यांच्या कार्याचा आर्थिक लाभ मिळतो तसेच सामाजिक, वैज्ञानिक व आर्थिक विकासाला हातभार लागतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस. एम. पवार होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी दैनंदिन जीवनात काढलेले छायाचित्रे, तयार केलेली डिझाईन्स किंवा इतर सर्जनशील कल्पनांमध्ये नाविन्य निर्माण केल्यास त्यावर कशाप्रकारे हक्क नोंदवता येतात, याबाबत मार्गदर्शन केले.
ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले व उपप्राचार्य डॉ. बी. के. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. के. मगरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतिश मेहेत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. डी. टी. साखरे यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



