नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वर्ष २०२५ ला निरोप देऊन नवीन वर्ष २०२६ चे स्वागत करताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हा पोलीस दल पूर्णतः सज्ज झाले आहे. नववर्ष साजरे करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाभर कडक बंदोबस्त व विशेष नियोजन करण्यात आले आहे.
पाचगणी, महाबळेश्वर, वाई, कास, बामणोली, तापोळा, मेढा, कोयनानगर आदी पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील किल्ले, धरणे व इतर संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक, ७० सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, सुमारे १२०० पोलीस अंमलदार व ७०० गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ७ विशेष पथकेही कार्यरत असणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुख्य रस्ते, चेकपोस्ट तसेच जिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी पॉइंट उभारण्यात येणार आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी सर्व पोलीस ठाण्यांना ब्रेथ अॅनालायझर मशीन देण्यात आले असून एकूण ३९ पथके तयार करण्यात आली आहेत.
प्रत्येक पोलीस ठाणे निहाय २ पथके हॉटेल, लॉज, ढाबे तपासणीसाठी नेमण्यात आली आहेत. विशेषतः पर्यटनस्थळांच्या ठिकाणी या तपासण्यांवर अधिक भर देण्यात येणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके कार्यरत राहणार असून उपविभागनिहाय ७ ‘निर्भया’ पथकांमार्फतही विशेष कारवाई करण्यात येणार आहे.
विहित वेळेपेक्षा जास्त काळ व मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात ३० ध्वनीमापक पथके (Noise Level Meter Squads) तयार करण्यात आली आहेत. ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात पण नियमांच्या चौकटीत राहून करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ ‘डायल ११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक, सातारा यांनी केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



