संभाजीनगर येथे सुशासन सप्ताहाची आजपासून पूर्वतयारी
शिवशाही वृत्तसेवा , वैजापूर ( प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी )
सेवा पुस्तक अद्यावतीकरण
अधिकारी असो वा कर्मचारी त्याच्या सेवा कार्यकाळातील सर्व महत्त्वाच्या नोंदी या सेवापुस्तकात ठेवल्या जातात, त्यामुळे अद्यावत राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबद्दल प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांनी दक्ष असले पाहिजे. सेवा पुस्तक हा कर्मचाऱ्याच्या सेवा काळाचा आरसा असतो,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
जिल्ह्यात दि.१९ ते २५ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या पूर्वतयारीचा टप्पा आजपासून सुरु करण्यात आला. त्यात आज सेवापुस्तक नोंदींचे अद्यावतीकरण करण्यात आले. सुशासन सप्ताहात सेवा वितरण सुधारण्यासाठी अर्जांचे निवारण, राज्य पोर्टलवरील सार्वजनिक तक्रारींचे निवारण, सीपी ग्राम्स पोर्टलवरील तक्रारींचे अनावरण, नागरिक सनदचे अद्यावतीकरण, पीजी पोर्टल तक्रारींचे निवारण, सर्वोत्तम प्रशासन पद्धतीचा अवलंब असे विविध टप्पे राबविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत आज जिल्ह्यात सेवापुस्तक नोंद अद्यावतीकरण राबविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तसेच सर्व शाखांचे प्रमुख, आस्थापना विभागाचे कर्मचारी तसेच सर्व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक कर्मचाऱ्याला आपले सेवापुस्तक देऊन त्यात तपासावयाच्या नोंदींची सुची देण्यात आली. त्यानुसार अपूर्ण असलेल्या नोंदी तात्काळ संबंधित आस्थापना कारकुनाकडून अद्यावत करुन घेण्यात आल्या.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपण सेवा करत असतांना दैनंदिन व्यापात आपल्या महत्त्वाचे दस्तऐवज असतांना सेवा पुस्तक याकडेच दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मग ज्यावेळी सेवानिवृत्तीची वेळ जवळ येते त्यावेळी सेवा पुस्तकातील त्रुटी पूर्ण करण्यासाठी धावाधाव होते. त्याकरीता आपले आरोग्य आणि सेवा पुस्तक याबाबत नेहमी दक्ष असले पाहिजे. या अद्यावतीकरणानंतर सर्वांचे सेवापुस्तक हे ऑनलाईन उपलब्ध करण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले.
१०७७ जणांचे सेवापुस्तक होणार अद्यावत
जिल्ह्यात मुख्यालयी आणि तालुकापातळीवर आज ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात अपर जिल्हाधिकरी एक, उपजिल्हाधिकारी १४, तहसिलदार १२, लेखाधिकारी २, लघुलेखक १ असे गट अ चे ३०, गट ब चे नायब तहसिलदार ४३, सहायक लेखाधिकारी १, उपलेखापाल १ असे ४६, गट ब अराजपत्रित लघुलेखक ५, गट क मधील अव्वल कारकून १७२, मंडळ अधिकारी ८५, महसूल सहायक १४४, तलाठी ४७३, वाहन चालक १४ असे एकून ८८८ आणि शिपाई १०८ असे एकूण १०७७ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकाचे अद्यावतीकरण या अभियानात केले जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिली.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














