धोम पाटबंधारे व वाई नगरपालिका यांच्यातील जमीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
मागील ५५ वर्षात वाई तालुक्याबरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा पाण्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवणाऱ्या धोम धरणग्रस्तांवर आज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा उभारण्याची वेळ आली आहे. आपली संपूर्ण गावं ज्या वाईच्या भागातील लोकांनी सामाजिक बांधिलकी जपत वाई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या स्वप्नांना जलसमाधी देणाऱ्या या धरणग्रस्तांवर आज धोम पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रचंड मोठा अन्याय करण्यात आला आहे.
आज धोम धरणाच्या जलाशया शेजारी असणाऱ्या जमिनी त्याचबरोबर धोम धरणाच्या भिंतीच्या समोर अधिग्रहण केलेल्या जमिनी या मूळ मालकांना परत मिळाव्या म्हणून एक मोठ आंदोलन पश्चिम भागामध्ये उभे राहत आहे.
वाई नगरपालिका यांच्या पाणीपुरव योजनेसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने गट क्रमांक १५३ व गट क्रमांक १६० असे दोन क्षेत्र २०२३ साली चालू वर्षाच्या रेडीरेकनर दरानुसार वाई नगरपालिकेला १.०९ हेक्टर व ५ गुंठे असे दोन क्षेत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ठरावाप्रमाणे विक्री केले.
हे करत असताना ज्या मूळ उद्देशासाठी या जमीन शेतकऱ्यांकडून विकत घेण्यात आल्या त्या मूळ उद्देशाला सोडून आज या जमिनीची विक्री करण्याचा निर्णय शासन करत आहे. ही विक्री करत असताना १.०९ हेक्टर क्षेत्र हे दस्ताप्रमाणे ०.०० रुपये म्हणजे एकही रुपया न घेता वाई नगरपालिकेला विकण्यात आले. ५ गुंठे क्षेत्र हे ७.५५ लाख रुपये घेऊन वाई नगरपालिकेला विकण्यात आले. दोन्हीही फेरफार यांची तपासणी केली असता यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शासनाच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी एकाच कारणासाठी दोन गटातील क्षेत्र नगरपालिकेला विक्री करतात व ठरावानुसार रेडी रेकनर दरानुसार त्यांना पैसे मिळाले असल्याची माहिती देतात मात्र वास्तविक परिस्थितीमध्ये फेरफार मध्ये मात्र यासाठी जो मोबदला देण्यात आला आहे.
त्यामध्ये मोठी तफावत जाणवते. यामुळे पश्चिम भागातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी धरणासाठी दिल्या त्यांच्यावर हा प्रचंड मोठा अन्याय आज कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांना भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनींमध्ये करण्यात आलेली बांधकामे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून तोडण्यात आली. आज धोम पाटबंधारे विभागाच्या अधिग्रहण क्षेत्रांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या लोकांना विद्युत पुरवठ्याच्या नवीन कनेक्शन साठी अडवणूक करण्यात येते. धोम पाटबंधारे विभागाच्या क्षेत्रातून शेतीसाठी जमिनीखालून पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात.
जल लक्ष्मी सारख्या योजनांवर मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी आकारली जाते. मात्र वाई नगरपालिकेसारख्या संस्थांना याच भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी मात्र फुकट दिल्या जातात. या अन्यायाविरोधात येणाऱ्या काळामध्ये पश्चिम भागातून मोठा आवाज उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र भिलारे माजी पंचायत समिती उपसभापती विक्रांत डोंगरे शिवसेना नेते विकास शिंदे आरपीआयचे युवा नेते स्वप्निल भाई गायकवाड युवा नेते बाळासाहेब चिरगुटे अशोक मांढरे रोहित वाडकर ज्ञानदेव सणस व पश्चिम भागातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














