नामदार मकरंद पाटील यांच्या कार्यास सलाम
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
पश्चिम भागातील तीर्थक्षेत्र धोम येथील प्रबुद्ध नगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंदिर व बुद्धविहार मंदिर पूर्णत्वास जावे, या जिव्हाळ्याच्या विषयासाठी गेल्या २ ते ३ दिवसांपासून वाई तहसील कार्यालयासमोर शांततामय आंदोलन सुरू होते.
माजी उपसभापती विक्रांत डोंगरे यांच्या मध्यस्थीने, धोम परिसरातील माता-भगिनी, तरुण, सहकारी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हे आंदोलन उभारण्यात आले होते. सदर मंदिर व बुद्धविहारासाठी लागणारा निधी आदरणीय नामदार मकरंद पाटील यांनी यापूर्वीच मंजूर केला असून, त्या कामाचा श्री गणेशा विक्रांत डोंगरे यांच्या हस्ते, परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, माता-भगिनी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.
मात्र, याच गावातील काही लोकांनी या पवित्र कार्यात अडथळे निर्माण करून काम बंद पाडले, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या अन्यायाविरोधात धोम गावातील नागरिक किसन भिवा कांबळे व विकास भगवान कांबळे यांनी वाई तहसीलदार कार्यालयासमोर सलग चार दिवस आमरण उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ व माता-भगिनी सहभागी होत, “आम्हाला न्याय द्या” अशी आर्त हाक त्यांनी आदरणीय आबांकडे दिली. नागपूर येथे अधिवेशनात असतानाही नामदार मकरंद पाटील यांनी स्पीकर फोनद्वारे संपूर्ण प्रशासन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) यांना तातडीच्या सूचना देत, या प्रकरणी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देत, सदर विषय दहा दिवसांत निकाली काढण्याचे ठाम आश्वासन दिले. माजी उपसभापती विक्रांत डोंगरे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे दोन्ही ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लागला असून, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या नामदार मकरंद आबा पाटील व मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या विक्रांत डोंगरे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










