न्यायालयाकडून ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मारहाण करणाऱ्या आरोपीला सातारा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मधुकर संपत यादव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, वाई येथील न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
ही घटना २३ फेब्रुवारी २०२० रोजी घडली होती. आरोपी मधुकर यादव याने एका अल्पवयीन बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आरोपीने तिला स्वतःच्या घराच्या माडीवर नेऊन दरवाजा बंद करून डांबून ठेवले. यावेळी घाबरलेली पीडिता जोरात ओरडू लागली असता, आरोपीने तिचे तोंड दाबून तिला मारहाण केली आणि भिंतीवर ढकलून दिले. याप्रकरणी भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शाम विनायक बुवा यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षाने एकूण ८ साक्षीदार तपासले. सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. दयाराम एस. पाटील आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. एम. यु. शिंदे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. हा खटला यशस्वी करण्यासाठी वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे, भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज ताटे, तसेच पैरवी अधिकारी आणि पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडच्या अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. या निकालामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



