आरक्षण घेऊनच परत येणार - सकल मराठा समाज
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी तसेच मुंबईतील कोणताही मराठा बांधव उपाशी राहू नये यासाठी सकल मराठा समाज-वाई तालुका यांनी कंबर कसली असुन आज जवळपास तीन टेम्पोमधून अन्न-पाण्याची रसद मुबंईसाठी रवाना केली.
यामध्ये जवळपास २५ हजार भाकरी, १०० किलो खर्डा, १० हजार बांधवाना पुरेल एवढे बिस्कीट, फरसाण, लाडू, चिक्की, लोणचे, १० हजार पाणी बॉटल याचा समावेश आहे. अल्पवेळात केलेल्या आवाहनाला वाईसह तालुक्यातील मराठा बांधवांनी प्रतिसाद देत ही रसद जमा करून मुंबईच्या दिशेने रवाना केली. गेले तीन ते चार दिवस झाले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो बांधवांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यात आपला खारीचा वाटा असावा आणि आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सकल मराठा समाज-वाई तालुका हेसुद्धा पूर्ण ताकतीने एकवटले आहेत.
या मदतीमुळे आंदोलकांना नक्कीच ताकत मिळेल असेही सकल मराठा समाज-वाई तालुका यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, सरकारने केलेल्या कृत्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करत, 'एक मराठा लाख मराठा' घोषणांनी मराठा बांधवांनी परिसर दणाणून सोडला. अन्न-पाण्याचे तीन टेम्पो, मराठा बांधवांसाठी १५ वाहने तसेच एस टी, बस, ट्रॅव्हल्स मधून जवळपास ५०० बांधव मुंबईसाठी रवाना झाले असुन आरक्षण घेऊनच परत येण्याचा निर्धार करत रवाना झाले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा