वाई तालुका ओबीसी संघटनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुका ओबीसी संघटनेच्यावतीने वाई उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना जातनिहाय जनगणना करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत आहे. विविध न्यायालयीन निर्णय, आंदोलने व राजकिय घडामोडी यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने समाजात तणाव वाढणार नाही याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी वाई तालुका ओबीसी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.
आरक्षणाचा उद्देश हा सामाजिक, शैक्षणिक, व आर्थिक द्रुष्टया मागासलेल्या घटकांना न्याय देणे हा आहे. त्यामूळे त्याचे राजकारण न करता प्रत्यक्ष मागासलेपणाचा शास्त्रशुध्द व डेटा आधारीत अभ्यास करावा. याकरीता जातीनिहाय जनगणना हा एकमेव मार्ग असल्याचे वाई तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष ॲड. विठ्ठल कदम यांनी स्पष्ट केले. राज्य व केंद्र सरकारने एकत्रितपणे निष्पक्ष व पारदर्शक जातनिहाय जनगणना करावी आणि मिळालेली आकडेवारी प्रसिध्द करावी. ही माहिती सार्वजनिक न केल्यास समाजात संभ्रम व संशय निर्माण होईल. त्यामूळे पारदर्शकता हाच विश्वास निर्माण करण्याचा पाया आहे असेही त्यांनी सांगितले.
आरक्षणावरुन समाजात तणाव निर्माण न होता घटनात्मक व शास्त्रशुध्द मार्गाने सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री यांनी प्रयत्न करावा व ओबीसींना न्याय द्यावा. अन्यथा ओबीसींच्या रोशास सामोरे जावे लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार यांना निवेदन दिल्यांनतर सरकार विरोधी घोषणा देत राज्य शासनाने काढलेल्या आरक्षण जीआरची होळी करून निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हा ओबीसी संघटना नेते सुरेश कोरडे, सदाशिव शिंदे, नारायण शिंदे, सागर जमदाडे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल लोहार, प्रमोद क्षीरसागर, रामचंद्र बनवडे, प्रकाश ससाणे, किशोर जाधव, मधुकर फरांदे, रवींद्र फरांदे आदीसह ओबीसी बांधव उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














