आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर झळकला भारताचा तिरंगा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
गेली अनेक दशके प्रतिकूल परिस्थिती आणि संकटांशी झुंज देणाऱ्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीतील एका जिद्दी मावळ्याने साताऱ्याची मान अभिमानाने उंचावली आहे. नुकतेच, या धाडसी गिर्यारोहकाने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर असलेल्या किलीमांजारोवर यशस्वी चढाई करून त्यावर भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. त्याच्या या ऐतिहासिक पराक्रमाने केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण भारताची शान वाढली आहे.
वाई येथे जन्मलेल्या अभिजीत उल्हास भोईटे (वय ४०) याला लहानपणापासूनच गडकिल्ल्यांचे आकर्षण होते. महाराष्ट्रातील कळसुबाईसह अन्य शिखरेही त्याने सर केली आहेत. नोकरीनिमित्त सध्या तो दुबई येथे स्थायिक झाला आहे. सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांमध्ये लहानाचा मोठा झालेल्या या मावळ्याने किलीमांजारोसारख्या आंतरराष्ट्रीय शिखरावर चढाई करण्याचे स्वप्न लहानपणीच उराशी बाळगले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. प्रचंड उंची, हवेतील कमी होणारा ऑक्सिजनचा साठा आणि उणे १८ अंश सेल्सिअस तापमान अशा अनेक नैसर्गिक आव्हानांचा सामना करत त्याने आपली वाटचाल सुरू ठेवली. त्याच्या या गिर्यारोहणाने फक्त शिखराची उंचीच नाही, तर त्याने त्याच्या जिद्दीची उंचीही सिद्ध केली.
किलीमांजारो शिखर मोहीम ही कोणत्याही गिर्यारोहकासाठी एक मोठी परीक्षा असते. बर्फाच्छादित डोंगररांगांमधून वाट काढत अंतिम शिखरावर पोहोचणे हे अत्यंत कठीण असते. वाटेत अनेकदा शरीराला थकवा जाणवतो, ऑक्सिजनची कमतरता होते आणि हिमबाधेचा धोकाही असतो. परंतु, आपल्या ध्येयावर ठाम असलेल्या अभिजीत भोईटे या सह्याद्रीच्या सुपुत्राने कोणत्याही संकटासमोर हार मानली नाही. प्रत्येक क्षणी 'जय भवानी, जय शिवाजी'चा नारा देत, त्याने आपले पाऊल पुढे टाकले, येणाऱ्या अडथळ्यांनी खचून न जाता उलट त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत अखेरीस तो किलीमांजारोच्या कळसावर पोहोचला.
हे शिखर सर करण्यासाठी त्याने स्वतःच्या सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतली होती. एकूण आठ दिवसांचा हा कॅम्प होता. यासाठी त्याने लिमोशु रूटची निवड केली होती. दुबई सारख्या उष्ण प्रदेशातून थेट नीचांकी तापमानात गिर्यारोहण करणे हा खरंतर पूर्ण विरोधाभास होता; परंतु अभिजीत याने सुरक्षिततेची सर्व साधने व मार्गदर्शकाच्या सूचनांचे पालन करून येणारी अनेक आव्हाने समर्थपणे पेलली. कधी कडाक्याची थंडी तर कधी ऊन, कधी घसरट्या पायवाटा तर कधी भरभरून घाम फोडणाऱ्या दऱ्या अशा साहसी गिर्यारोहणाचा त्याने अनुभव घेत १५ ऑगस्ट रोजी हे शिखर सर करण्यास सुरुवात केली आणि २१ ऑगस्टला त्याने हे शिखर यशस्वी सर करत त्याच्या कळसावर भारताचा राष्ट्रध्वज फडकविला. ५८९५ मीटर उंच (१९,३४० फूट) हे शिखर सर करणे म्हणजे गिर्यारोहकांसाठी एक स्वप्नपूर्तीच ठरते, जी अभिजीतने पूर्ण केली.
तिरंगा फडकवण्याचा अविस्मरणीय क्षण
शिखरावर पोहोचल्यावर, आपल्या छातीत साठवलेल्या सर्व सामर्थ्याने त्याने तिरंगा फडकवला. आकाशाला गवसणी घालणाऱ्या त्या बर्फाळ शिखरावर जेव्हा तिरंगा वाऱ्याच्या झुळकीवर डोलू लागला, तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हा क्षण त्याच्यासाठी फक्त एक गिर्यारोहण मोहीम पूर्ण झाल्याचा नव्हता, तर अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि स्वप्नांचे फलित होते. या विजयाने त्याला केवळ वैयक्तिक समाधान मिळाले नाही, तर युवकांना प्रेरणा देणारा आदर्शही त्याने उभा केला आहे.
अनेक अनुभव अन् अनेक आशा
या मोहीमेदरम्यान, त्याला निसर्गाच्या रौद्र आणि सुंदर अशा दोन्ही रूपांचा अनुभव आला. या प्रवासाने त्याला धैर्य, संयम आणि सातत्य या गुणांची शिकवण दिली. आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण ठेवून, त्याने ही मोहीम गिर्यारोहणाचे स्वप्न बाळगणाऱ्या त्या तमाम युवकांसाठी अर्पित केली.
शिखरापलीकडचा प्रवास
किलीमांजारो एक सामान्य चढाई नाही. कोणीही सहज चढू शकतो हा एक गैरसमज आहे. या ट्रेकने मला विस्मयकारक निसर्ग दाखवला. हिरवीगार पर्जन्यवने, अल्पाइन वाळवंटे आणि बर्फाच्छादित डोंगरही दाखवले. रात्री थंडी असह्य होती. वाऱ्यामुळे माझे पाय गोठून जात होते. ते माझ्या निर्धाराची परीक्षा घेत होते. रोज सरासरी आठ किलोमीटरची चढाई होती आणि चौथ्या दिवसापर्यंत मला उंचीच्या आजाराने गाठले. अगदी लहानसा आवाजही मला त्रासदायक वाटू लागला. थंडीमुळे दात सतत दुखत होता आणि त्यामुळे दर पाच तासांनी वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागत होत्या. किलीमांजारो कधीच अंतिम रेषा नव्हती. ती पुढील प्रवासाची सुरुवात आहे. मी माझ्या पुढील साहसाची योजना आधीच आखली आहे. कारण प्रत्येक शिखर एका नव्या कथेला जन्म देत असते. मला असे वाटते की माझ्या या अनुभवातून अनेक तरुण गिर्यारोहकांना नवीन स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल आणि भारताची पताका जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्वोच्च शिखरांवर डौलाने फडकत राहील
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














