सेवाकार्य फाउंडेशन संस्थेच्या वतीने तब्बल दोन ट्रॉली मूर्ती नदीपात्रातून काढण्यात आल्या
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाई शहरातील सामाजिक संस्थांनी यंदा कृष्णा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांना मूर्ती नदीत विसर्जित न करता त्याऐवजी संस्थांना दान करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमास ३० ते ३५ टक्के प्रतिसाद मिळाला असला तरी, अनेकांनी मूर्ती थेट नदीपात्रात विसर्जित केल्या.
गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने मोठ्या संख्येने भग्नावस्थेतील गणेश मूर्ती नदीत उघड्या पडल्या. हे विदारक दृश्य पाहून कृष्णा नदी सेवाकार्य फाऊंडेशन, वाई या संस्थेने तात्काळ कृतीला सुरुवात केली.
आज दि. ८ सप्टेंबर संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत ब्राम्हणशाही, धर्मपुरी आणि गणपती घाट या परिसरातून दोन ट्रॉली भरून मूर्ती नदीतून बाहेर काढण्यात आल्या. या मूर्तींचे विसर्जन नगरपालिकेने तयार केलेल्या विशेष तलावात अत्यंत सन्मानपूर्वक करण्यात आले.
गेल्या दहा वर्षांपासून कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या या संस्थेचे कार्य अतिशय स्तुत्य असून, जुने घाट जतन करण्याचे कामही त्यांच्याच माध्यमातून सुरू आहे. यावेळी संस्थेचे स्वयंसेवक, नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कृष्णा नदी सेवाकार्य फाऊंडेशन वाईकरांना पुन्हा एकदा आवाहन करते की, गणेश विसर्जनाच्या पवित्र कार्यात पर्यावरणाचा विचार करून मूर्तींचे शास्त्रशुद्ध व सन्मानपूर्वक विसर्जन करावे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














