नगरसेवकांची संख्या २१ वरून २४ वर पोहचली
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. यंदा नगरपरिषदेतील सदस्यसंख्या २१ वरून २४ इतकी वाढली असून एकूण १२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड होणार असून त्यात महिलांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
नगर विकास विभागाच्या आदेशानुसार प्रभाग रचना समितीमार्फत तयार केलेला प्रस्ताव विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी मान्य केला. त्यानंतर १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत प्रारूप रचना नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नगरपरिषद कार्यालयात लेखी स्वरूपात दाखल कराव्यात. प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे. मुदतीनंतर आलेल्या हरकती व सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग रचनेतील ठळक बाबी -
- मागील वेळी २१ सदस्य; आता २४ सदस्य
- एकूण १२ प्रभाग, प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवकांची निवड
- महिलांसाठी आरक्षणाची तरतूद
- हरकती व सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख - ३१ ऑगस्ट २०२५
शिरूर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व भागांचा समावेश या प्रारूप प्रभाग रचनेत करण्यात आला असून नागरिकांच्या सहभागातून अंतिम आराखडा निश्चित होणार आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा