विदर्भात २५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांत राज्यात एकूण ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यातील २५० पेक्षा अधिक आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या आहेत. बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वाशीम हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावतीत ५०, अकोलात ४८, बुलढाण्यात ४२ आणि वाशीममध्ये ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.
राज्य सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ₹१ लाखाची आर्थिक मदत देण्याचे धोरण ठेवले आहे. जानेवारी ते मार्च दरम्यानच्या २५७ प्रकरणांपैकी ७६ प्रकरणांना मदत मंजूर झाली आहे, तर ७४ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारणे म्हणजे कर्जबाजारीपणा, शेतीतील नुकसान, उत्पादन खर्च आणि बाजारभाव यातील फरक, तसेच मानसिक तणाव असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी ₹२० कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच, मानसिक आरोग्य सेवा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कृषी मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. विरोधकांनी या विषयावर विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शाश्वत हमीभाव, कर्जमाफी योजना आणि मानसिक आरोग्य केंद्रांची गरज असल्याचे शेतकरी संघटनांचे मत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा