अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी गावात जाऊन नागरिकांना केले धान्य वाटप
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील सर्वच गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमधून सुरळीत धान्य वाटप सुरू आहे. मात्र, त्यास अपवाद ठरले आहे खानापूर ता. वाई हे गाव तेथील ग्रामस्थांना स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे . त्यामुळे गावातील जनतेला स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे रेशनिंग धान्य दुकानदाराच्या कारणाम्या मुळे ग्राहकांना धान्य मिळण्यास अडचणी येत होत्या. याबाबत वाई तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली होती.
याची दखल घेत वाई अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी खानापूर ता. वाई येथे गावात जाऊन सर्व नागरिकांना स्वस्त धान्याचे वाटप करून माणुसकी आजही जिवंत असल्याचे अधोरेखित करून दाखवले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर ता. वाई येथील स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र सुभेदार जाधव. वय५२ , राहणार खानापूर ता. वाई यांने लाभार्थ्यांच्या हक्काचे एक लाख ४१ हजारांचे धान्य काळया बाजारात विकुन मोठा अपहार केला होता.
वाईचे नायब तहसीलदार समीर बेग मिर्झा यांनी स्वस्त धान्य दुकानदाराने केलेल्या अपहारा प्रकरणी वाई पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे सदर स्वस्त धान्य दुकानदारास काळया यादीत टाकले होते. त्यामुळे खानापूर गावातील नागरिकांना स्वस्त धान्य मिळताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सदरची बाब लक्षात घेऊन व नागरिकांना होणारा त्रास यासाठी वाई अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून संबंधित ग्राहकांना नियमानुसार धान्य वाटप केले.
विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी काम करून जवळपास 270 लाभार्थ्यांना धान्य वाटप केले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत
अन्न पुरवठा अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव
स्वस्त धान्य दुकानदारांच्या कारणाम्यामुळे खानापूर ता. वाई गावातील नागरिकांना रेशनिंग धान्य मिळण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र, वाईच्या तहसीलदार यांनी तातडीने केलेली उपाययोजना व अन्नपुरवठा अधिकाऱ्यांनी ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता गावामध्ये जाऊन धान्य वाटप केले . त्यामुळे धान्य मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. गावातील सर्व नागरिकांनी अन्नपुरवठा अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. नागरिकांचा आनंद पाहून अन्नपुरवठा अधिकारी सुद्धा सुखावले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा