वसंत व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प - मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पिढ्यान पिढ्या चालत आले म्हणून प्रमाण मानू नये, ज्या गोष्टीची अनुभूती येते केवळ तेच सत्य. असे वक्तव्य सुप्रसिद्ध मनोविज्ञान व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर यांनी वसंत व्याख्यानमालेच्या पाचव्या पुष्पात 'मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती' या विषयावर बोलताना केले. तेव्हा सुरेश यादव अध्यक्षस्थानी होते.
कोहिनकर म्हणाले, तीन वर्षांपूर्वीच्या सर्वेक्षणानुसार शंभरातील एक माणूस मानसिक दृष्ट्या असंतुलित असतो तर ३३ माणसे सीमारेषेवर असतात, भारतातील जनसंख्येच्या १०% लोकांना झोप न येण्याचा त्रास सतावतो, उच्च रक्त दाबांमध्ये भारतीयांचा क्रमांक पहिला लागतो. या सर्वावर मात करायची असेल तर आरोग्य दक्षता आणि मनाची शक्ती जाणून घेणे गरजेचे.
जे मनन करते ते मन. हे मन शरीराच्या अनुरेणूत असते. निरोगी काया हे सर्वात मोठे सुख असते. स्वामी विवेकानंदांनी स्वतः निरोगी कायेचे महत्व विशद केले आहे. भगवद्गीता, कुराण, गुरुग्रंथसाहिबा यातील कोणताही ग्रंथ समजण्यासाठी समर्थ शरीराची गरज आहे. कमकुवतता म्हणजे मरण. बळी हा बकरीचा देतात सिंहाचा नव्हे. आर्थिक, मानसिक, भौतिक सर्वउद्दिष्ट पूर्तीसाठी आधी आरोग्य असावे लागते.
आपले सचेतन मन अल्लाउद्दीन तर अचेतन मन दिव्यासारखे असते. सचेतन मनाचा हुकूम अचेतन मन दिव्यातील राक्षसाप्रमाणे ऐकते. तुम्ही नाही म्हणालात तर सापाचे विषही बाधू शकत नाही. अमेरिकेतील प्रयोगांवरून मनाची ही शक्ती सिद्ध झाली आहे. कोरोना काळात याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. मन सकारात्मक व नकारात्मक संप्रदाकांची निर्मिती करते. त्यामुळे जुन्या काळातील 'चांगले बोलावे चांगले ऐकावे' या विचाराला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.
भगवान गौतम बुद्धांचा आन-अपान -सती हा श्वासाचा सिद्धांत मनाच्या शक्तीसाठी महत्त्वाचा आहे. श्वासाचे अवगमन मनाच्या शांततेवर अवलंबून असते. म्हणूनच ध्यान हा मन शांत करण्याचा उत्तम उपाय असतो. तुम्ही तुमच्या मनाची बाराखडी बदला. ९०% आजार मानवी मनाशी संबंधित असतात. शब्द हेच जग. मनाचे एक युद्ध जिंकणारा योद्धा हजारो युद्ध जिंकणाऱ्या युद्धापेक्षा श्रेष्ठ ठरतो. ज्या गोष्टीची भीती वाटते ते खरंतर भयावह नसते. आपल्या मनावर हे भीतीचे संस्कार करण्यात आलेले असतात. आपण आणि यश यांच्यामध्ये फक्त भीती असते. मनाने सीमा तोडल्यावर शरीर त्या सीमा पाळत नाही. पराभव हा आधी मनात होतो मग रणांगणावर. म्हणूनच मनातील भीतीचा पराभव करा.
कोहिनकर यांनी अमेरिकेच्या प्रयोगशाळांमधून शिकलेले अनेक प्रयोग प्रेक्षकांना करून दाखवले. स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, समर्थ रामदास यांच्या विचारांनी प्रेक्षकांचे मन प्रेरित केले. सेल्फ रिअशूरेन्स, व्हिजन बोर्ड, नाईन थ्री नाईन रुल, लॉ ऑफ अट्रॅक्शन आदि संकल्पना पडद्यावर दाखवून प्रेक्षकांना समजावल्या.
ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. श्रेयांश जैन यांनी परिचय केला. डॉ अंजली अरुण पतंगे, डॉ गंधाली व डॉ केदार वनारसे हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते. अनेक विद्यार्थ्यांनी व श्रोत्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा